Ind vs Aus: भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना रडवलं; सिडनी कसोटी ड्रॉ राखण्यात यश

0
194
  • पंतचं शतक हुकलं; पुजाराची निर्णायक खेळी
  • १३१ षटकं फलंदाजी करत सामना वाचवला

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पार पडलेला तिसरा कसोटी सामना सोमवारी(११ जानेवारी) अनिर्णित राखण्यात यश मिळवले. या सामन्यात चौथ्या दिवसाखेरपर्यंत ऑस्ट्रेलियन संघाचे वर्चस्व होते. पण सोमवारी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय संघाने धैर्य दाखवले आणि सामना अनिर्णित राखला. त्यामुळे सध्या भारतीय संघाचे खुप कौतुक होत आहे. एवढेच नाही तर ‘द वॉल’ राहुल द्रविडला त्याच्या वाढदिवसाची सर्वात उत्तम भेट भारतीय संघाने दिल्याचंही बोलले जात आहे. खुद्द आयसीसीनेही याबाबत ट्विट केले आहे.

दुखापतीनंतर एखाद्या योद्ध्याप्रमाणे मैदानावर तग धरून हनुमा विहारी आणि अश्विन यांनी तब्बल २५९ चेंडू खेळून काढत तिसरी कसोटी अनिर्णीत राखत, बॉर्डर गावसकर मालिका १-१ बरोबरीत सोडली आहे. विहारी-अश्विन दोघेही फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाले होते. अशा परस्थितीतही दोघांनी संयमी फलंदाजी करत सामना वाचवला. विहारी-अश्विन यांनी सहाव्या गड्यासाठी २५९ चेंडूत ६२ धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघानं पाच गड्यांच्या मोबदल्यात ३३४ धावापर्यंत मजल मारली.

चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंतने 72 वर्षांचा विक्रम मोडला

सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी 43.3 षटकांत 148 धावांची भागीदारी केली. यासह चौथ्या डावात सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम या दोघांनी आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियामधील चौथ्या डावातील ही दुसर्‍या क्रमांकाची भागीदारीदेखील आहे. यापूर्वी 1949 मध्ये विजय हजारे आणि रशियन मोदी यांनी चौथ्या डावात अखेरच्या दिवशी 139 धावांची भागीदारी केली होती.

ऑस्ट्रेलियात चौथ्या डावात सर्वाधिक षटके खेळणारा भारत आशियाई संघ ठरला

भारतीय संघाने चौथ्या डावात 131 षटकांची फलंदाजी करताना सिडनी कसोटी ड्रॉ केली. यासह ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना जिंकण्यासाठी चौथ्या डावात सर्वाधिक षटके खेळणारा भारत आशियाई देश बनला आहे. यासह चौथ्या डावात सामना ड्रा करण्यासाठी सर्वाधिक षटके खेळणारा भारत चौथा संघ ठरला आहे. 1979 मध्ये भारताने सर्वाधिक 150.5 षटके खेळली होती.

विहारी आणि अश्विन यांच्या नावेही मोठा विक्रम

भारतासाठी कसोटी ड्रॉ होण्यात हनुमा विहारी आणि आर. अश्विन या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 259 चेंडूत 62 धावांची नाबाद भागीदारी केली. यासह भारतासाठी सहाव्या विकेटसाठी सर्वाधिक षटके खेळण्याचा विक्रम या दोघांच्या नावे झाला आहे. कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात 1992 नंतर प्रथमच असे घडले आहे, जेव्हा भारताच्या चार फलंदाजांनी 100 किंवा त्यापेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला होता.