एकदिवसीय भारत आणि इंग्लंड संघ सामना, पुण्यात आयोजीत करण्याबाबत चा निर्णय अखेर निश्चित झाला आहे. भारत आणि इंग्लंड संघांमध्ये, पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर 23, 25 आणि 28 मार्च रोजी तीन वन डे सामने खेळवण्यात येणार आहे. सर्व सामने दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहेत.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, तीनही सामन्यांचे आयोजीत स्थळ बदलण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता कोरोना नियमांचे पालन करण्यात येणार असून, प्रेक्षकांविना हे सामने पुण्यात आयोजीत करण्याबाबत राज्य सरकारकडून परवानगी देण्यात येणार आहे, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत घेतला आहे. तसेच हे एकदिवसीय सामने घेताना खेळाडू, सपोर्ट स्टाफचे सदस्य आणि पंच यांची योग्य ती काळजी घेण्याची विनंतीही उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला केली आहे.
महाराष्ट्रामधील सामन्यांसाठी आज महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष विकास काकतकर व मुंबई क्रिकेट संघटनेचे गव्हर्निंग कॉन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी भारत व इंग्लंडमधील एकदिवसीय सामने महाराष्ट्रात होऊ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या सामन्यांसाठी हिरवा कंदील तर दर्शवला मात्र अट देखील टाकली आहे.
पुण्यात होणारे हे तिन्ही सामने विनाप्रेक्षक खेळवले जातील, असं सांगण्यात आलं आहे. पुण्यात करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे पुढचा धोका टाळण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे.