Tokyo Olympic 2020 : नीरज चोप्रानं घडवला इतिहास; देशासाठी पहिलं ‘गोल्ड’ मिळवलं

0
348

भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याच्या खेळीकडं भारताच्या नजरा लागल्या होत्या. करोडो भारतीयांचं स्वप्न नीरजनं पूर्ण करत टोकियो ऑलम्पिकमधील पहिलं सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं आहे. पहिल्या राऊंडमध्ये 87.03 मीटर लांब भाला फेक करत त्यानं आघाडी मिळवली. नीरज चोप्रा भारताला यंदाच्या ऑलंम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देतो का याकडं सर्वांच लक्ष लागलं होतं, अखेर करोडो भारतीयांचं स्वप्न नीरज चोप्रानं पूर्ण केलं आहे. नीरजने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले होते. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिलं सुवर्णपदक आहे.

ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राने आपलं गोल्ड मेडल हे मिल्खा सिंह यांना समर्पित केलं आहे. जगप्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंह यांना हे मेडल समर्पित करण्याचा निर्णय नीरजने घेतला आहे. मिल्खा सिंह आणि पीटी उषा काही सेकंदाच्या फरकाने मेडलपासून दूर राहिले होते. मात्र जगभरात आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या या जेष्ठ खेळाडूंना नीरजने आपलं मेडल समर्पित केलं आहे.

नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली
ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स म्हणजे अॅथलेटिक्स हे कोणत्याही ऑलिम्पिक खेळांचे मुख्य आकर्षण असते, परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीयांनी या स्पर्धांमध्ये पदक जिंकले नाही. ब्रिटिश भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती, परंतु तो इंग्रज होता, भारतीय नव्हता. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.

भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या नीरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ५vमेगा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. तेव्हापासून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे.

नीरज चोप्रा हा हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील आहे. भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नवह्ती. सुरुवातीच्या काळात नीरज चोप्रा इतरांप्रमाणं क्रिकेट खेळत होता. नीरज चोप्रानं मार्च 2021 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस पटियाळा येथे 88.07 मीटर इतक्या अंतरावर भाला फेकला होता. 2018 मध्ये नीरज चोप्रानं आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. त्यावेळी त्यानं 88.06 मीटर भाला फेकला होता.

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडून 6 कोटी जाहीर

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरज चोप्रा याचं अभिनंदन केलं आहे. हरियाणा सरकारच्या वतीनं 6 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. नीरज चोप्राची इच्छा असल्यास त्याला क्लास वन दर्जाची नोकरी देऊ, अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे.