ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने रचला इतिहास: ९६ वर्षांत पहिल्यांदा जिंकलं सुवर्ण पदक

0
432

भारताने जागतिक ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत रविवारी इतिहास रचला.ऑनलाईन पार पडलेल्या या स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच विजेतेपदावर नाव कोरलं आहे. मात्र भारत आणि रशियाला संयुक्त विजेता म्हणून घोषित करण्यात आलं. जागतिक बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारताने रविवारी ९६ वर्षांत पहिल्यांदाच सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला. ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. स्पर्धेदरम्यान इंटरनेटच्या तांत्रिक बिघाडामुळे रशियासह भारताला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले.

फायनलमध्ये भारताचे दोन खेळाडू निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांनी सर्व्हरसोबत कनेक्शन होत नसल्याने वेळ गमावला. त्यामुळे रशियाला विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र, भारताने वादग्रस्त निर्णयाला विरोध केल्याने याची समिक्षा करण्यात आली. त्यानंतर दोन्ही देशांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. भारताने ९६ वर्षांत पहिल्यांदाच सुवर्ण पदक जिंकले आहे. भारताचा दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद यांनी ट्विट करत आनंद साजरा केला आहे. “आम्ही चॅम्पियन आहोत, रशियाचं अभिनंदन!”

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ FIDE ने प्रथमच ऑनलाईन स्वरूपात ऑलिम्पियाडचे आयोजन केले होते. यावेळी, भारतीय संघात कर्णधार विदित गुजराती, माजी विश्वविजेते विश्वनाथन आनंद, कोनेरू हम्पी, डी हरिका, आर प्रगगनानंद, पी हरीकृष्ण, निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांनी रशियाविरुद्ध भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने पहिल्यांदाच कोविड-१९ च्या महामारीमुळे अशा प्रकारे ऑनलाइन ऑलिंपियाडचे आयोजन केले होते. दरम्यान, संस्थेने ट्विट करीत अंतिम निर्णय घोषित केला. फिडे अध्यक्ष अर्काडी डोवोरकोविच यांनी दोन्ही संघ भारत आणि रशियाला फिडे ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेचा विजेता घोषीत करीत दोघांना सुवर्णपदक देण्याचा निर्णय घेतला.

जागतिक ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्तपणे का होईना भारताला पहिल्यांदाच विजेतेपद मिळाल्याने भारतीय संघावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष आणि अभिमानास्पद बाब म्हणजे नाशिकचा युवा बुद्धिबळपटू विदित गुजराथी हा भारताचा कर्णधार असल्याने त्याने भारतासह नाशिकचे नाव सातासमुद्रापार जाऊन पोहोचवले. विदितसह संपूर्ण भारतीय संघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह क्रीडाक्षेत्रातील अनेक दिग्गजांनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.