तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला आहे. भारताचा या सामन्यात १२ रनने पराभव झाला आहे. भारतीय संघाने टी-२० मालिका २-१ ने जिंकली आहे. याआधी भारताने वनडे मालिका २-१ ने गमावली होती. भारतीय संघ २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमवत १७४ रनच करु शकला. यासोबतच तीन सामन्याची टी-२० मालिका भारतानं २-१ च्या फरकानं जिंकली आहे. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत ऑस्ट्रेलियाच्या संघानं भारताची विजयी घौडदौड रोखली आहे. याआधी भारतीय संघानं लागोपाठ ११ सामन्यात पराभव न होण्याचा विक्रम केला होता. मात्र, ऑस्ट्रेलियानं विराटसेनेचा विजयरथ रोखला आहे.
२०१९ मध्ये भारतानं विडिंजचा मुंबईत पराभव केला होता. त्यानंतर २०२० च्या सुरुवातीला श्रीलंकाविरोधात टी-२० मालिका पार पडली होती. यात पहिला सामना पावसाने वाया गेल्यानंतर उर्वरित दोन्ही सामन्यात भारतानं विजय संपादन केला होता. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं लागोपाठ पाच टी-२० सामने जिंकले होते. आता ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दोन सामन्यात पराभव करत दहा विजयाची नोंद केली. मात्र, टी-२० मालिकेतील अखेरचा सामना ऑस्ट्रेलियानं जिंकत भारतीय संघाचा विजयरथ रोखला. त्याआधी,यष्टीरक्षक मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या टी-२० सामन्यात १८६ धावांचा डोंगर उभा केला. भारतीय क्षेत्ररक्षकांनी तिसऱ्या टी-२० त अतिशय खराब कामगिरी करत सोपे झेल सोडले, ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला मिळाला. वेड आणि मॅक्सवेल जोडीने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. वेडने ८० तर मॅक्सवेलने ५४ धावांची खेळी केली.
अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजीचं मोठं आव्हान परतवून लावण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात १२ धावांनी बाजी मारत कांगारुंनी टी-२० मालिकेचा शेवट गोड केला आहे. १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची आक्रमक खेळी केली. परंतू दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला. अखेरचा सामना भारताने गमावला असला तरीही टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारण्यात भारत यशस्वी ठरलाय.