टोकियो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा: चक दे इंडिया..! मेरी कोम आणि मनप्रीतनं केलं भारतीय पथकाचं नेतृत्व

0
329

जगातील सर्व क्रीडास्पर्धांचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकचे शुक्रवारी (२३ जुलै) बिगुल वाजले. जपानची राजधानी टोकियो येथे ही स्पर्धा सुरु झाली. कोरोनाचे सावट असल्या कारणाने यावेळी स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याच वेळी, स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात परंपरेनुसार सर्व देशांच्या खेळाडूंचे संचलन पार पडले. या उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाने सहभाग नोंदवला. टोकियो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याच्या मार्चपास्टमध्ये भारतीय तुकडी २१ व्या क्रमांकावर उतरली. यात २२ खेळाडू आणि ६ अधिकारी सहभागी झाले. या मार्चपास्टमध्ये ग्रीकचा पहिला क्रमांक होता.

मेरी कोम व मनप्रीतने केले भारताचे नेतृत्व
उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकातर्फे १२७ खेळाडूंपैकी २६ सदस्य संचलनात सहभागी झाले. भारताच्या पथकाचे ध्वजवाहक म्हणून २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवणारी बॉक्सर मेरी कोम व हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांना संधी मिळाली. इतर सर्व खेळाडूंनी आपआपल्या हातात छोटा-छोटा तिरंगा घेतला होता.

11,238 खेळाडूंनी घेतला सहभाग
टोकियो ऑलिम्पिक 2020 च्या स्पर्धेत 11 हजार 238 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. यावेळी ऑलिम्पिमध्ये 33 क्रिडा प्रकारात 339 सुवर्ण आहेत. उद्घाटन समारंभात जपानचा सम्राट नरुहिटोसुद्धा हजर होता. यावेळी शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकणार्‍या बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांना विशेष ऑलिम्पिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे सर्वात मोठे पथक
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे आजवरचे सर्वात मोठे पथक सहभागी होणार आहे. यामध्ये, १२७ खेळाडू ८४ मेडल इव्हेंट्समध्ये सहभागी होतील. समावेश असेल. जगभरातील २०५ देशांमधील तब्बल अकरा हजार खेळाडू पदकांसाठी प्राणपणास लावतील. या वर्षी भारतीय संघाला कमीत कमी १० पदके मिळवण्याची आशा आहे.

भालाफेकपटू नीरज चोप्रा, तिरंदाजीपटू दीपिका कुमारी, कुस्तीपटू बजरंग पुनिया व विनेश फोगट यांच्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा असतील. नेमबाजीत भारताला चार पदके मिळण्याची शक्यता आहे.