IND vs AUS : दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय, मालिकाही जिंकली

0
221

भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा दुसरा सामना भारताने जिंकला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 195 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताने १९.४ ओव्हरमध्ये हे लक्ष्य पूर्ण केले. भारताने ६ विकेटने दुसरी टी-२० जिंकली आहे. भारताचा हा लागोपाठी टी-२० मालिकेतील दुसरा विजय आहे. यासाह भारताने मालिका ही जिंकली आहे. या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी खेळला जाणार आहे.

टीम इंडियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या संघाचा कर्णधार फिंच आजच्या सामन्यात खेळला नाही. त्याच्याऐवजी मॅथ्यू वेडने संघाची जबाबदारी सांभाळली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 195 धावांच लक्ष ठेवलं होतं. कर्णधार मॅथ्यू वेडने 32 चेंडूत 58 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यात 10 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. भारताकडून टी. नटराजन याने 2 बळी घेतले.

या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवनचं अर्धशतक (५२) आणि हार्दिक पांड्याच्या धडाकेबाज नाबाद ४२ धावांच्या जोरावर भारतीय संघाने सामना ६ गडी राखून जिंकला.हार्दिक पांड्याने धडाकेबाज खेळी करत विजयी षटकार हाणला. त्याने 22 चेंडूत 42 धावा करताना 3 चौकार आणि 2 षटकार मारले. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत झालेल्या पराभवाचा वचपा टीम इंडियाने टी20 मालिका जिंकून घेतला आहे. धडाकेबाज खेळी करुन भारताला विजय प्राप्त करुन देणाऱ्या हार्दिक पांड्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार मिळाला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेतला विजय हा विराटसाठी खूप खास होता. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांच्याच देशात टी-२० मालिका जिंकणारा विराट कोहली हा पहिला भारतीय कर्णधार बनला आहे. विराटच्या आधी इतर कोणत्याही भारतीय कर्णधाराने हा पराक्रम केला नव्हता आणि हा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.

सन २०२० मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा हा सलग ९ वा विजय आहे, तर टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात भारताने दुसरे सर्वाधिक लक्ष्य गाठले आहे. यापूर्वी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाने सिडनीमध्येच भारतापुढे 198 धावांचे आव्हान ठेवले होते. विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने गेल्या ७ टी-२० मालिकेत ६ मालिका जिंकल्या आहेत, तर फक्त १ मालिका ड्रॉ ठरली आहे.