आयपीएल २०२०: भारताऐवजी यूएईमध्ये होणार टूर्नामेंट

0
269
  • सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये घेण्याचा विचार करत आहे
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर IPL मध्ये अधिक खबरदारी घेतली जाणार

आयपीएल नेमके कुठे होणार, याची उत्सुकता चाहत्यांना होती. पण ही प्रतिक्षा आता संपलेली आहे. कारण यावर्षी होणारी आयपीएल आता युएईमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गव्हर्निंग काउंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी मंगळवारी सांगितले की, भारताऐवजी यूएईमध्ये आयपीएल टुर्नामेंट होईल, यासाठी आम्ही सरकारकडे परवानगी मागितली आहे. पुढील काही दिवसात आयपीएल गव्हर्निंग काउंसिलची मीटिंग होईल, यात फायनल शेड्यूल ठरवला जाईल.

पटेल पुढे म्हणाले की, टूर्नामेंट लहान होणार नाही. लीगमध्ये 60 सामने होतील. सोमवारी आयसीसीने टी-20 वर्ल्ड कप रद्द केल्यानंतर आयपीएलवर निर्णय घेण्यात आला. पटेल यांना टुर्नामेंट आयोजित करण्यात कोणत्या अडचणी येऊ शकतात, याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, टुर्नामेंट भारतात झाला किंवा दुसऱ्या देशात, ऑपरेशन पार्ट कठीण आहे.

आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्यांना काही परवानग्या घ्यावी लागणार आहेत. आयपीएल खेळवायचा निर्णय आता भारत सरकारवर अवलंबून असेल, असे म्हटले जात आहे. आयपीएल खेळवण्याची विनंती बीसीसीआय भारत सरकारला करणार आहे. सरकारने विनंती मान्य केली तरच आयपीएल खेळवता येऊ शकते. भारत सरकारने आयपीएलला मान्यता दिल्यावरच वेळापत्रक तयार केले जाणार आहे.

यापूर्वीही युएईमध्ये आयपीएल आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे युएईला आयपीएलच्या आयोजनाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळेच श्रीलंकेचा पर्याय खुला असताना बीसीसीआयने युएईला पसंती दिल्याचे समजत आहे. अबू दाबी, दुबई, शारजाह ही तीन मुख्य ठिकाणं असणार आहे. सरकारच्या परवानगीनंतर लीगचा संपूर्ण प्लान आखण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. आता तेथील सरकार आणि क्रिकेट संघटना बीसीसीआयला कसा पाठिंबा देते, यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत.

परदेशी खेळाडू थेट युएईमध्ये दाखल होणार

आयसीसीने यंदाच्या T-20 World Cup अंतिम निर्णय जाहीर करण्याआधीच फ्रेंचायझींनी आयपीएल स्पर्धेसाठी योजना आखण्यास सुरुवात केली होती. कोरोनामुळे भारताच्या बहुतांश खेळाडूंना सरावाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना सामने खेळण्याआधी सरावासाठी किमान तीन-चार आठवड्यांचा वेळ लागू शकेल. तसेच प्रत्येक फ्रेंचायझी आपल्या भारतीय खेळाडूंना युएईमध्ये घेऊन जाण्यासाठी चार्टर्ड विमानांचा वापर करण्याची शक्यता आहे, तर परदेशी खेळाडू त्यांच्या देशातून थेट युएईमध्ये दाखल होणार आहेत. आता लवकरच होणाऱ्या IPL Governing Council च्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होणे अपेक्षित आहे.