आयपीएल (IPL 2020) च्या ग्रुप स्टेजच्या सगळ्या मॅच संपल्यामुळे आता प्ले-ऑफचं चित्र स्पष्ट झालं आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बँगलोर या टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचल्या आहेत. मुंबई (Mumbai Indians) विरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबाद (SRH) चा विजय झाल्यामुळे त्यांनी प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला, तर याच मॅचमुळे कोलकाता (KKR) चं प्ले-ऑफमध्ये पोहोचायचं स्वप्न यावर्षीही भंगलं. हैदराबाद आणि कोलकाता यांचे समान पॉईंट्स असूनही हैदराबादचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे कोलकात्याचं आव्हान संपुष्टात आलं. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सवर मात करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबाद सलग पाचव्यांदा नॉकआऊट स्टेजमध्ये स्थान मिळवणारा तिसरा संघ बनला आहे.
पॉईंट्स टेबलमध्ये कोण कितव्या स्थानावर?
यंदाच्या मोसमातल्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर राहिली आहे. मुंबईने 14 पैकी 9 मॅच जिंकल्या असून 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. तर दिल्ली (Delhi Capitals) च्या टीमने 14 पैकी 8 मॅच जिंकल्या आणि 6 मॅच हरल्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. हैदराबाद, बँगलोर (RCB) आणि कोलकाता या तिन्ही टीमनी 7 पैकी 7 सामने जिंकले, पण नेट रनरेटमुळे या टीम तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर राहिल्या.
या मोसमात पंजाब (KXIP), चेन्नई (CSK) आणि राजस्थान (Rajasthan Royals) च्या टीमने 14 पैकी 6 मॅच जिंकल्या, तर 8 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. पण नेट रनरेटमुळेच पंजाब सहाव्या, चेन्नई सातव्या आणि राजस्थान शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर राहिली.
प्ले-ऑफचं वेळापत्रक
5 नोव्हेंबर- मुंबई विरुद्ध दिल्ली- क्वालिफायर-1, दुबई
6 नोव्हेंबर- हैदराबाद विरुद्ध बँगलोर- एलिमिनेटर, अबु धाबी
8 नोव्हेंबर- क्वालिफायर-2, अबु धाबी
10 नोव्हेंबर- फायनल, दुबई