कोरोनाच्या तडाख्यात आयपीलचा बळी; यंदाची आयपीएल स्पर्धा स्थगित

0
236

भारतामध्ये कोरोनाचा कहर असतानाही इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम सुरक्षितरित्या पूर्ण होऊ शकेल असा बीसीसीआयला विश्वास होता. मात्र, सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सचे दोन खेळाडू, तसेच चेन्नई सुपर किंग्सच्या काही सदस्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर मंगळवारी आणखी दोन खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोनाचा हा धोका लक्षात घेऊन अखेर बीसीसीआयने यंदाचा आयपीएल मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

सध्याच्या परिस्थितीत आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, पूर्ण रद्द केलेली नाही. काही दिवसांनंतर सर्व संबंधितांशी चर्चा करून, उर्वरित स्पर्धा घेता येईल का; कुठे व कशी घेता येईल आदीची चाचपणी केली जाईल,” असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.

बायो-बबलमध्येही करोनाने घुसखोरी केल्याने आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यातच बीसीसीआय सर्व सामने मुंबईत खेळण्याची तयारी करत होतं. मात्र यादरम्यान हैदराबादच्या वृद्धिमान साहा याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. हैदराबाद आणि मुंबईमध्ये आज दिल्लीत सामना होणार होता. खेळाडूंनाही करोनचाी लागण होत असल्याने अखेर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

खेळाडूंच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून, यंदाच्या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू आणि इतरही व्यक्तींची पूर्ण जबाबदारी बीसीसीआय घेत असल्याचं प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं गेलं आहे.

बायो बबल, सातत्यानं होणाऱ्या कोरोना चाचण्या आणि प्रत्येक पावलावर सावधगिरी बाळगूनही आयपीएल स्पर्धेत कोरोना विषाणूनं शिरकाव केलाच. खेळाडूंच्या मनात असणारी भीती सार्थ ठरली आणि कोलकाता संघातील काही खेळाडूंना या विषाणूची लागण झाली. सोमवारी यासंदर्भातील माहिती समोर आली. ज्यामुळं कोलकाता विरुद्ध बंगळुरु हा सामना रद्द करण्यात आला. तर, संघातील इतर खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय़ घेतला गेला. आयपीएलमध्ये कोरोनानं शिरकाव करण्यापूर्वीच काही परदेशी खेळाडूंनी भारतातील कोरोना परिस्थितीबाबत चिंतेचा सूर आळवत या स्पर्धेतून माघारही घेतल्याचं पाहायला मिळालं. आता मात्र हे संकट आणि अधिकाधिक खेळाडूंना होणारी कोरोनाची बाधा पाहाता बीसीसीआयकडूनच ही स्पर्धा स्थगित करण्यात आल्याचं वृत्त एएनआयनं प्रसिद्ध केलं आहे.