IPL 2021: २९२ खेळाडू लिलावाच्या मैदानात; श्रीसंतला लिलावासाठी मिळाले नाही स्थान?

0
296

इंडियन प्रीमियम लीग (आयपीएल) २०२१ च्या आधी १८ फेब्रुवारीला मिनी लिलाव होणार आहे. या लिलावापुर्वी बीसीसीआयने आयपीएलच्या लिलावासाठी २९२ खेळाडूंची अंतिम निवड केली आहे. यावर्षी १११४ खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली होती. पण त्यातील २९२ खेळाडूंचीच अंतिम निवड झाली आहे. नोंदणी केलेल्या खेळाडूंच्या यादीत आयपीएलच्या २०१३ च्या हंगामात स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला श्रीसंत देखील होता. मात्र, त्याला लिलावासाठी अंतिम निवड झालेल्या खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही.

आयपीएल २०२१ च्या लिलावासाठी एकूण १११४ खेळाडूंचे आपल्या नावाची नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ २९२ खेळाडूंची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. या सर्व खेळाडूंची यादी आयपीएलच्या सहभागी ८ संघांना पाठवण्यात आली आहे.

हरभजन, केदारची कमीत-कमी किंमत २ कोटी
आयपीएल २०२१ च्या लिलावामध्ये २ कोटी मुळ किंमत असणाऱ्या खेळाडूंच्या रांगेत एकूण १० नावांचा समावेश आहे. यामध्ये हरभजन सिंग आणि केदार जाधव या २ भारतीयांचा समावेश आहे. तर उर्वरित ८ परदेशी खेळाडू असून ग्लेन मॅक्सवेल, स्टिव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियाम प्लंकेट, जेसन रॉय आणि मार्क वुड अशी त्यांची नावे आहेत.

कोणत्या मुळ किंमतीला किती खेळाडू?
या लिलावात एकूण १२ खेळाडू असे आहेत, ज्यांची मुळ किंमत १.५ कोटी असेल. तर १ कोटी मुळ किंमत असणारे एकूण ११ खेळाडू असतील. यामध्ये हनुमा विहारी आणि उमेश यादव या भारतीयांचा समावेश आहे. त्याहून कमी किंमतीत अर्थात ७५ लाख रुपयांपासून १५ खेळाडूंची बोली सुरू होईल. तर तब्बल ६५ खेळाडूंची मुळ किंमत ५० लाख असेल. या ६५ खेळाडूंमध्ये १३ भारतीय तर ५२ परदेशी खेळाडू असतील.

२९२ शॉर्टलिस्ट खेळाडूंमध्ये १६४ भारतीय
आयपीएल २०२१ च्या लिलावासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या एकूण २९२ खेळाडूंमध्ये १६४ भारतीय आणि १२५ परदेशी खेळाडू आहेत. उर्वरित ३ खेळाडू हे असोसिएट देशांचे असतील.

चेन्नईमध्ये हा लिलावाचा सोहळा पार पडणार आहे. दुपारी ३ वाजता लिलाव प्रक्रियेला सुरूवात होणार असून हा केवळ एकाच दिवसाचा कार्यक्रम असणार आहे. या लिलावासाठी एकूण १६४ भारतीय, १२५ परदेशी आणि ICCशी संलग्न असलेल्या देशाचे ३ असे एकूण २९२ खेळाडू उपलब्ध असणार आहेत. यंदाच्या लिलावासाठी पंजाबच्या संघाकडे सर्वाधिक ५३.२० कोटी रूपये शिल्लक आहेत, तर हैदराबाद आणि कोलकाता संघाकडे सर्वात कमी प्रत्येकी १०.७५ कोटी रूपये शिल्लक आहेत.