जसप्रीत बुमराहचा विवाहसोहळा संपन्न; फोटो ट्विट करत दिली चाहत्यांना खुशखबर

0
192

भारताचा क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन सोमवारी विवाहबंधनात अडकले. बुमराहने ट्विटरवर याबाबतचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना खुशखबर दिली. ‘आम्ही आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आजचा दिवस हा आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांपैकी एक आहे. आमचा विवाहसोहळा पार पडला हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे,’ असे बुमराहने त्याच्या ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले.

कोरोनाचे सर्व नियम पाळून हा विवाहसोहळा पार पाडला. यामुळे लग्नाच्या कार्यक्रमात अगदी जवळचे लोकच सामील झाले होते. बुमराह आणि संजना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बुमराहच्या लग्नाच्या चर्चांना उधान आलं होतं. आज अखेर त्यांनी गुरुद्वाऱ्यामध्ये पंजाबी पद्धतीने विवाह सोहळा पार पाडला. बुमराह सोबतच संजनानेसुद्धा इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांना देत म्हटलं आहे. आम्ही एकमेकांच्या प्रेमापासून प्रेरित होऊन आमच्या आयुष्यातील या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. आणि याबद्दल सर्वांना कळवताना खूप आनंद होत आहे.या नवीन जोडप्यावर सोशल मीडियावरून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला.

संजना गणेशन कोण आहे?
28 वर्षीय संजना गणेशन ही क्रिकेट अँकर आहे. ती बर्‍याच क्रिडा स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहे. आयपीएलमध्ये सक्रिय राहण्याव्यतिरिक्त ती स्टार स्पोर्ट्ससोबत काम करत होती. 2019 आयसीसी विश्वचषक ते इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला संजनाने होस्ट केले आहे, त्याशिवाय संजना कोलकाता नाईट रायडर्सची अँकर म्हणून काम करत आहे. संजनाने 2013 मध्ये फेमिना गॉर्जियसचे विजेतेपद जिंकले होते.