किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने तुफानी शतकी खेळीसह अनेक विक्रम केले. केएल राहुलने आयपीएल २०२० मधईल पहिलं शतक झळकावत आयपीएलमध्ये २००० धावा पूर्ण करणारा तो वेगवान भारतीय खेळाडूही ठरला. राहुलने या सामन्यात फक्त ६९ चेंडूत १४ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद १३२ धावा केल्या. त्याचबरोबर त्याच्या स्फोटक खेळीसह तो आयपीएलमधील डावात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला.
केएल राहुल सर्वात वेगवान 2000 धावांचा टप्पा गाठणारा भारतीय फलंदाज
केएल राहुलने सामन्यात दोन धावा काढल्या आणि तो सर्वात वेगवान 2000 धावांचा टप्पा गाठणारा भारतीय फलंदाज ठरला. आयपीएलच्या 60 व्या डावात राहुलने हा विक्रम केला. याआधी आयपीएलमध्ये वेगवान 2,000 धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने 63 डावात हा पराक्रम केला होता. आता राहुलने 60 डावांमध्ये 2 हजार धावा करून सचिनला मागे टाकलं आहे.
राहुलच्या अखेरच्या 15 चेंडूत 55 धावा
राहुलने पहिल्या 54 चेंडूत 77 धावा केल्या. त्यानंतर पुढच्या 15 चेंडूंमध्ये राहुल तडाखेबाज खेळी करत 55 धावा काढल्या. राहुल 69 चेंडूत 132 धावा करत नाबाद राहिला. राहुलने आपल्या खेळीत 14 चौकार आणि सात षटकार ठोकले. राहुलच्या या तुफानी डावामुळे पंजाबने शेवटच्या चार षटकांत 74 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १९१.३० इतका होता.
बेंगळुरूने १७ षटकात सर्व बाद १०९ धावा केल्या. एकट्या राहुलने केलेल्या १३२ धावा देखील बेंगळुरूच्या सर्व फलंदाजांना करता आल्या नाहीत.
आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या
ख्रिस गेल- नाबाद १७५
मॅक्कुलम- नाबाद १५८
एबी डिव्हिलियर्स- नाबाद १३३
केएल राहुल- नाबाद १३२