RCBvsMI : मुर्ती लहान किर्ती महान ईशान किशनची अप्रतिम खेळी

0
290

इंडियन प्रिमीयर लीगच्या 13 व्या सीझनमधील दहाव्या सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांत खेळवण्यात आला. काल पार पडलेला हा सामना अत्यंत रंगतदार होता. विराट कोहलीच्या टीमने पहिल्यांदा फलंदाजी करत मुंबई इंडियन्सच्या विरोधात तीन विकेट्स गमावत 201 धावा केल्या. हे लक्ष्य गाठत मुंबई इंडियन्सची सुरुवात तशी फारशी चांगली झाली नाही. परंतु, रोहित शर्माच्या संघाने शेवटी स्कोअर बरोबरीला आणला. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. शेवटपर्यंत रंगलेल्या सुपर ओव्हरच्या थरारात अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ विजयी झाला.

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात RCB ने बाजी मारली असली तरीही मुंबई इंडियन्सच्या इशान किशनच्या खेळीचं सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. २०२ धावसंख्येचा पाठलाग करताना संघ संकटात सापडलेला असतानाही इशानने संयमी खेळी करत एक बाजू लावून धरत संघाचं आव्हान कायम राखलं. कायरन पोलार्डसोबत इशान किशनने ११९ धावांची भागीदारी केली. मुर्ती लहान किर्ती महान काय असते ते ईशान किशनच्या खेळीने प्रचितीही आली.

अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत इशान किशन आणि कायरन पोलार्ड जोडी मुंबईला विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच किशन इसुरु उदानाच्या गोलंदाजीवर ९९ धावांवर बाद झाला. अवघ्या एका धावेने किशनचं शतक हुकलं असलं तरीही आयपीएलमध्ये युएईत खेळत असताना मुंबई इंडियन्सकडून सर्वोच्च धावसंख्या करण्याचा मान किशनने मिळवला आहे. इशान किशनने ५८ चेंडूत २ चौकार आणि ९ षटकारांसह ९९ धावा केल्या.

मुंबई इंडियन्सच्या संघाला बंगलोर विरुद्धच्या सामन्यात जिंकण्यासाठी शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये 90 धावांची गरज होती. मुंबईने शेवटच्या 30 चेंडूंमध्ये 89 धावा केल्या. याआधी ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये कोणत्याच संघाने शेवटच्या 30 चेंडूंमध्ये एवढ्या धावा केल्या नव्हत्या. पण यंदाच्या मोसमातला पहिलाच सामना खेळणाऱ्या मुंबईच्या ईशान किशननं झुंझार खेळी करत पोलार्डच्या साथीने अशक्य असणारे आव्हान सुद्धा शक्य करता येथे याची प्रचिती आली.