अन्य क्रीडा प्रकारांप्रमाणेच कुस्तीलाही कोरोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे मानाची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार की नाही याबाबद अनेकांना प्रश्न पडला होता. कुस्ती क्षेत्रातील मानाच्या महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद स्पर्धेबाबतची अनिश्चितता संपुष्टात आली आहे. राज्य शासनाने या स्पर्धा घेण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात ही स्पर्धा होणार आहे. 64व्या किताबी लढती बरोबरच वरिष्ठ गटाची माती आणि गादीवरील कुस्ती स्पर्धाही होणार आहे.
कोरोनाचे संकट असले तरी नियमांचे पालन करुन ही स्पर्धा आयोजित व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेने भारतीय कुस्ती महासंघ आणि महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून आता ही स्पर्धा पुढील महिन्यात पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात होण्याची शक्यता आहे. असे झाले तर पुण्याला १३ व्यांदा मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धचे आयोजन करण्याची संधी मिळेल.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पाठपुरावा केला होता. करोनाविषयक सर्व शिष्टाचारांचे पालन करून या स्पर्धेला परवानगी देण्यात आली आहे. शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्यक्ष संपर्क असलेल्या क्रीडा प्रकारांमध्ये कुस्तीचा समावेश होता. याआधी वैयक्तिक कौशल्य आणि तंदुरुस्तीपुरती खेळाडू आणि प्रशिक्षकांना प्रमाणित कार्यपद्धतीनुसार परवानगी होती. मात्र शासनाच्या या आदेशाने अन्य स्पर्धा संयोजकांनाही दिलासा मिळाला आहे.
माती आणि गादीवरील प्रत्येकी 10 अशा एकूण 20 गटांमध्ये ही कुस्ती स्पर्धा होत असते. मात्र कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेचं नियोजन आणि वेळापत्रक बदलणार असून एरवी तीन ते चार दिवसात संपणाऱ्या या स्पर्धेचा कालावधी लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोना संसर्ग लक्षात घेता खबरदारी म्हणून सर्व उपाययोजना करण्यात येतील असं या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं काल स्पष्ट केलं. सुरक्षित अंतर राखणे,सॅनिटायझरचा वापर करणे, थर्मन स्कॅनिंग, इत्यादी कोविड-१९ करिता घालून दिलेल्या सर्व निकषांचे पालन करण्याच्या अटीवर स्पर्धेच्या आयोजनाला परवानगी देण्यात आली असल्याचे शासनाने पत्रकात म्हटले. ‘‘शासनाने दिलेल्या अटी-शर्तीनुसार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी परवानगी मिळाली आहे. आता कार्यकारिणी समितीच्या बैठकीत आम्ही आयोजनाचे धोरण ठरवू,’’ अशी माहिती राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दिली.