टोकियो ऑलिम्पिक:मीराबाई चानूने भारताला मिळवून दिले पहिले पदक; भारतीय पुरुष हॉकी संघाची विजयी सुरुवात

0
484

टोकियो ऑलिम्पिकला सुरुवात झाली आहे. तर या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने खातं उघडलं आहे. वेटलिफ्टींगमध्ये भारताने सिल्वर मेडलला गवसणी घातली आहे. भारताकडून मीराबाई चानू हिने सिल्वर मेडल पटकावलं आहे. मीराचं हे मेडल भारतासाठी पहिलं मेडल ठरलं आहे. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात मीराबाईने रौप्य पदक मिळवलं आहे. मीराबाई चानूने शानदार प्रदर्शन करत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात 87 किलो वजन उचललं तर क्लीन अँड जर्कमध्ये तिने 115 किलो वजन उचलत पदकावर शिक्कामोर्तब केलं.

भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. कर्णम मल्लेश्वरीने हे पदक भारताला मिळवून दिले होते. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघाची टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरुवात 

दुसरीकडे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघानेही चांगली सुरुवात केली आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला आहे.

गेल्या चार दशकांपासून पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय संघाने अगदी भारतीय नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. हॉकी टीम इंडियाने ग्रुप ए हा सामना जिंकला आहे.

न्यूझीलंडकडून पेनल्टी कॉर्नर स्पेशलिस्ट केन रसेलने सहाव्या मिनिटाला गोल केला. तर लगेच दहाव्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर रुपिंदर पाल सिंहने भारतासाठी गोल करत बरोबरी केला. ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगने 26 आणि 33 व्या मिनिटांना गोल केले. शिवाय न्यूझीलंडकडून स्टीफन जेनिसने 43 व्या मिनिटाला दुसरा गोल केला. अशा पद्धतीने 3-2 ने भारताने न्यूझीलंडचा पराभव केला.

नेमबाज सौरभ चौधरी अंतिम फेरीत पोहोचला

दुसरीकडे भारतीय नेमबाज सौरभ चौधरी 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. सहाव्या मालिकेच्या पात्रता फेरीत सौरभने 600 पैकी 586 गुण मिळवून प्रथम स्थान मिळवले. या इव्हेंटमध्ये आणखी एक भारतीय नेमबाज अभिषेक पात्रता फेरीतच बाद झाला. 575 गुणांसह तो 17 व्या स्थानावर राहिला. पात्रता फेरीमध्ये टॉप-8 क्रमांकाच्या नेमबाजला अंतिम सामन्यात स्थान मिळते.