Mithali Raj Retirement : मितालीचा क्रिकेटला अलविदा; २३ वर्षे केली भारतीय क्रिकेटची सेवा

0
285

क्रिकेट जगताला भारताने अनेक दिग्गज क्रिकेटपटू दिले आहेत. यातील एक म्हणजे भारताची अव्वल दर्जाची महिला क्रिकेटपटू मिताली राज. भारतीय महिला संघासाठी (Team India) 23 वर्षे क्रिकेट खेळलेल्या मितालीने बुधवारी दुपारी सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान, 39 वर्षीय मितालीने आजवर क्रिकेटच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करताना अनेक रेकॉर्ड्स नावे केले आहेत. मिताली गेल्या २३ वर्षांपासून क्रिकेटशी निगडीत होती. मिताली राजमुळे अनेक मुलींना क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण झाली आणि अनेक मुलींची आणि पालकांची ती प्रेरणास्थान बनली आहे.

चाहत्यांना ट्विट करून दिली माहिती
मिताली राजने वयाच्या ३९ व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली. मिताली राजने ट्विट करून लिहिले की, जेव्हा मी निळ्या रंगाची जर्सी घालून माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले तेव्हा मी लहान होते. हा प्रवास सर्व प्रकारचे क्षण पाहण्यासाठी पुरेसा होता. गेली २३ वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक होती. इतर प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही संपत आहे आणि आज मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे. मला मिळालेल्या सर्व पाठिंब्याबद्दल मी बीसीसीआय आणि श्री जय शाह सर यांचे आभार मानू इच्छिते, असं मितालीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

उजव्या हाताची फलंदाज मिताली राज ही न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकाचा (World Cup) शेवटचा भाग होती, परंतु तिच्या नेतृत्वाखाली संघ उपांत्य फेरीपूर्वी बाहेर पडला. हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक असल्याचे बोलले जात होते. आता तिने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. काही वर्षांपूर्वी तिने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती.

मिताली राजची कारकीर्द

जून १९९९ मध्ये आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मितालीच्या नावावर आहे. भारतासाठी तिने १२ कसोटी सामन्यांमध्ये ४३.६८च्या सरासरीने ६९९ धावा केल्या. मिताली राजने टीम इंडियासाठी २३२ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने ७ हजार ८०५ धावा केल्या होत्या. मिताली राजच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये ६४ अर्धशतकं आणि ७ शतकं आहेत. तसेच टी-२० मध्ये १७ अर्धशतकं झळकावले आहेत.

तसेच तिने १५५ वनडे सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले असून ८९ सामने जिंकले आहेत. तसेच ६३ सामन्यांत तिला कर्णधार म्हणून पराभव पाहावा लागला आहे. त्याचबरोबर ३ सामन्यांचा निकाल लागलेला नाही. त्याचबरोबर तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २००५ आणि २०१७ साली महिला वनडे विश्वचषकाचा उपविजेता राहिला आहे.

मितालीने आतापर्यंत सहा विश्वचषकांमध्ये सहभाग घेतलेला आहे. तिच्या नावावर महिला क्रिकेटमधील अनेक विक्रम नोंदवले गेलेले आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसीच्या महिला एकदिवसीय क्रमवारीमध्ये ती सातव्या स्थानवर होती.

मिताली राजचे प्रमुख रेकॉर्ड्स

  • मितालीला लेडी तेंडुलकर म्हटलं जातं, कारण भारतासाठी वनडे आणि टी20 क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावा तिनेच केल्या आहेत.
  • 2017 महिला क्रिकेट विश्व चषकादर्मयान मितालीने सलग सात अर्धशतक लगावली असून अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला क्रिकेटर आहे.
  • मिताली विश्वचषक स्पर्धेत 1,000 हून अधिक धावा करणारी पहिली भारतीय आणि पाचवी महिला क्रिकेटर आहे.
  • मिताली आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात दोन हजार धावा करणारी पहिली महिला भारतीय क्रिकेटर आहे.
  • मिताली 20 वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली महिला क्रिकेटर आहे.
  • 200 वनडे सामने खेळणारी एकमेव महिला क्रिकेट मितालीच आहे.
  • सहा एकदिवसीय वर्ल्ड कप खेळणारी मिताली एकमेव महिला क्रिकेटर आहे.
  • टेस्ट सामन्यात दुहेरी शतक ठोकणारी मिताली एकमेव भारतीय महिला क्रिकेटर असून 2002 साली तिने इंग्लंड विरुद्ध 214 धावांची खेळी केली होती.

मिताली राजला मिळालेले पुरस्कार

अर्जुन पुरस्कार- २००३
पद्मश्री पुरस्कार- २०१५
मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार- २०२१

मिताली राज वरील “शाब्बास मितू” बायोपिक लवकरच चित्रपटगृहात आपल्याला पाहायला मिळणार असून त्यात अभिनेत्री तापसी पन्नूने मिताली राजची भुमिका केली आहे

बीसीसीआयचे आभार –

मितालीने तिच्या पोस्टमध्ये बीसीसीआयसह इतर लोकांचे आभार मानले आहेत. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एकीकडे तिच्या निवृत्तीची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला, तर दुसरीकडे अनेक जण तिला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. बायोपिकमधील मिताली राजची भूमिका करणारी अभिनेत्री तापसी पन्नूने तिला शुभेच्छा दिल्या आहेत.