भारतीय महिला संघाची वनडे कर्णधार मिताली राज आज(3 डिसेंबर) वाढदिवस साजरा करत आहे. भारताकडून सर्वाधिक वनडे सामने खेळणारी मितालीने वयाच्या 16 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. जसे पुरुष क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला महान म्हटले जाते. तसे महिला क्रिकेटमध्ये मिताली राजने ते स्थान पटकावले आहे. भारतीय महिला टीमला उत्तुंग शिखरावर नेण्यामध्ये मिताली राजचे विशेष योगदान आहे.
१९९९ साली १७ वर्षाची असतांना आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळला आणि क्रिकेटविश्वात पदार्पण केले. लष्करी कुटुंबातून आलेली, मिताली आठ वर्षांची असताना शास्त्रीय नृत्य शिकत होती. पण त्यानंतर वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्याने हातात बॅट घेतली आणि हैद्राबादच्या सेंट जॉन स्कूलमध्ये आपल्या मोठ्या भावासोबत क्रिकेटचे प्रशिक्षण सुरू केले. त्यानंतर मितालीला क्रिकेटमध्ये आवड निर्माण झाल्याने पुरुष क्रिकेटमध्येही सहभाग घेऊ लागली.
भारताच्या या सर्वात यशस्वी महिला फलंदाजाबद्दल काही खास गोष्टी-
- मिताली राजचा जन्म 3 डिसेंबर 1982 साली जोधपुर, राजस्थानमध्ये झाला. तिचे वडील इंडियन एअर फोर्समध्ये ऑफिसर आहेत.
- मितालीला लहानपणी शास्त्रीय नृत्याची आवड होती. तिने भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचे धडेही गिरवले होते. तिला यात कारकिर्दही घडवायची होती. पण नंतर ती क्रिकेटकडे वळाली.
- मिताली लहानपणी खूप आळशी असल्याने तिला शिस्त लागावी आणि तिच्यातील आळशीपणा जावा म्हणून तिच्या पालकांनी क्रिकेट खेळाशी तिची ओळख करुन दिली. तिने एका मुलाखतीतही सांगितले होते की ती सुरुवातीला तिच्या पालकांना आनंदात बघण्यासाठी फक्त क्रिकेट खेळायची.
- मितालीचे वय 16 वर्षे 250 दिवस असताना तिचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले. तिने आयर्लंड विरुद्ध 26 जून 1999 मध्ये पदार्पण करताना 114 धावांची शतकी खेळीही केली. ती त्यावेळी वनडे पदार्पणात शतकी खेळी करणारी सर्वात तरुण महिला क्रिकेटपटू ठरली होती.
- त्याचबरोबर तिचे 114 धावा या वनडे पदार्पणातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. वनडे पदार्पणात शतक करणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली होती. तिने पदार्पण केलेल्या सामन्यातच तिच्याबरोबर रेश्मा गांधीनेही पदार्पण केले होते. तसेच रेश्मानेही शतक केले. पण रेश्माने मितालीच्या आधी शतक केल्याने ती वनडे पदार्पणात शतक करणारी पहिली भारतीय महिला ठरली.
- मिताली 21 वर्षे 4 दिवसाची असताना तिने पहिल्यांदा भारतीय महिला संघाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे ती भारतीय महिला संघाची सर्वात तरुण कर्णधारही ठरली. तिने भारतीय महिला संघाचे सर्वाधिक वनडे सामन्यात नेतृत्व केले आहे. आत्तापर्यंत तिने 120 वनडे सामन्यात भारतीय महिला संघाचे कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
- मितालीने खेळलेल्या 10 कसोटी सामन्यांपैकी तिसरा कसोटी सामना तिच्यासाठी खास ठरला. कारण तिने त्या सामन्यात द्विशतकी खेळी करतामा 214 धावा केल्या. 16 आॅगस्ट 2002 ला तिने ही खेळी केली होती.
- तिला 2003 मध्ये भारत सरकारकडून अर्जून पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच त्यानंतर 2015 मध्ये तिचा चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार- पद्मश्री पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला.
- तसेच तिला 2015 मध्ये विस्डेनचा सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटूही ठरली.
मिताली राजमुळे भारतीय महिला क्रिकेटला ओळख मिळाली. मिताली राजच्या खेळीमुळे अनेक तरुणींना क्रिकेटची गोडी लागली. भारतातील तरुणीही क्रिकेटला करिअर म्हणून बघू लागले. अशा या महान खेळाडू मिताली राजला देसीडोकं टीमकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.