#ThankYouMahi: ‘कॅप्टन कूल’ धोनी ने केले आंतराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय

0
503

भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार असलेल्या एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इन्स्टाग्रामवर धोनीने एक व्हिडिओ पोस्ट करून आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. एवढे वर्ष दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आपण सगळ्यांचे धन्यवाद देतो, असं धोनी म्हणाला आहे. इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनीने ‘मे पल दो पल का शायर हूं’ हे गाणं ठेवलं आहे.

आत्तापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो किंवा त्याने अनेकदा हातातून गेली अशी वाटणारी जिंकलेली मॅच असो धोनीचा खेळ क्रिकेटरसिक कधीही विसरणार नाहीत.

२००४ साली धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. २००७ साली टी-२० वर्ल्ड कपमध्ये धोनीने पहिल्यांदाच भारताचं कर्णधारपद भूषवलं. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सीरिजमध्ये धोनीने भारताला २००७ सालच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून दिला. यानंतर २००८ साली ऑस्ट्रेलियातही भारताने वनडे सीरिज धोनीच्याच नेतृत्वात जिंकली. त्यानंतर २०११ साली धोनी कर्णधार असताना भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडकाला गवसणी घातली होती, त्याचबरोबर धोनीच्या काळात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होता, असे म्हटले जाते. कारण धोनी कर्णधार असताना भारताने सर्वात जास्त सामने जिंकले होते. धोनीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाची चांगली बांधणी केली होती. त्याचबरोबर काही खेळाडूंना घडवण्यामध्ये धोनीचा सिंहाचा वाटा होता.

धोनीने ३५० वनडेमध्ये ५०.५८ च्या सरासरीने १०,७७३ रन केले, यामध्ये १० शतकं आणि ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर ९८ टी-२० मॅचमध्ये धोनीने ३७.६ च्या सरासरीने १,६१७ रन केले. टी-२० क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर २ अर्धशतकं आहेत. २०१४ सालीच धोनीने टेस्ट क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतली होती. ९० टेस्ट मॅचमध्ये धोनीने ३८.०९ च्या सरासरीने ४,८७६ रन केले. यामध्ये ६ शतकं आणि ३३ अर्धशतकं होती.

९ जूलै २०१९ ला एमएस धोनी शेवटचा मैदानात दिसला होता. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनल मॅचनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही.

धोनीचे हे विक्रम मोडणे केवळ अशक्य:-

१. कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने

एमएस धोनीने तब्बल ३३२ आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्त्व केले आहे. ५३८ सामन्यांपैकी ३३२ सामन्यात संघाचे नेतृत्त्व करणे नक्कीच छोटी गोष्ट नाही. तब्बल १० वर्ष वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये धोनीने देशाचे नेतृत्त्व केले आहे.

२. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक खेळाडूंना यष्टीचीत करणारा यष्टीरक्षक

आपल्या यष्टीरक्षणाच्या अनोख्या शैलीमुळे एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओळखला जातो. ५३८ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या धोनीने यात तब्बल १९५ खेळाडूंना यष्टीचीत केले आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा कुमार संगकारा आहे. त्याने १३९ यष्टीचीत केले आहेत.

३. आयसीसी वनडे क्रमवारीत जलद अव्वल स्थानी येणारा फलंदाज

एमएस धोनी पदापर्णानंतर केवळ ३ वर्षात भारतीय संघाचा कर्णधार झाला. २००५ वर्षात केलेल्या मोठ्या खेळींमुळे ४२ डावानंतरच तो आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला होता.

४. आयसीसीच्या सर्व ट्राॅफी जिंकणारा जगातील एकमेव

एमएस धोनीने कर्णधार म्हणून २००७ साली टी२० विश्वचषक, २०११ साली क्रिकेट विश्वचषक, २०१३ साली आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी स्पर्धा जिंकली. आयसीसीच्या या तीन मुख्य स्पर्धा वरिष्ठ गटातील क्रिकेटपटूंसाठी असतात. आयसीसीने चॅम्पियन्स ट्राॅफी ही स्पर्धा रद्द केली आहे. त्यामुळे ती पुढे कोणताही कर्णधार जिंकण्याची शक्यता नाही.