आयपीएल २०२०: मुंबई इंडियन्सचा फायनलमध्ये प्रवेश; दिल्ली कॅपिटल्सचा ५७ धावांनी पराभव

0
286

आयपीएल 2020 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. IPL 2020 मधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबईच्या संघानं दिल्लीचा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. मुंबईच्या संघानं दिल्लीचा ५७ धावांनी पराभव केला. चार गडी बाद करत आपल्या गोलंदाजीनं विरोधी संघात दहशत निर्माण करणारा जसप्रीत बुमराह यावेळी विजयाचा खरा हिरो ठरला. शिवाय त्यानं या सामन्यात काही विक्रमही रचल्याचं पाहायला मिळालं.

मुंबई इंडियन्सने फलंदाजी करत २० षटकांमध्ये पाच गड्यांच्या मोबदल्यात २०० धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला केवळ १४३ धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबई इंडियन्सने प्लेऑफच्या पहिल्याच सामन्यात हा विजय मिळवत सहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. मुंबईचा संघ त्यांच्या फंलदाजांच्या आणि गोलंदाजांच्या भन्नाट कामगिरीच्या जोरावर प्लेऑफमध्ये पोहचली.

दिल्लीकडून स्टोयनिसने 46 चेंडूत 65 धावांचे तुफानी डाव खेळला. या दरम्यान त्याने सहा चौकार आणि तीन षटकार लगावले. त्याचवेळी अक्षर पटेलने 33 चेंडूत 42 धावा केल्या. या खेळीत त्याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले.

मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टने कमालीची गोलंदाजी केली. बुमराहने त्याच्या चार षटकांत केवळ 14 धावा देऊन चार गडी बाद केले. त्याच वेळी, बोल्टने दोन षटकांत एक निर्धाव षटक 9 धावा देत दोन गडी बाद केले. याशिवाय क्रुणाल पंड्या आणि किरन पोलार्डला प्रत्येकी एक यश मिळालं.

मुंबई याआधी 2010, 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये फायनल्समध्ये पोहोचली होती. कालच्या सामन्यात दिल्लीचा पराभव झाला असला तरी, दिल्लीचा आयपीएल 2020 मधील प्रवास अद्याप संपलेला नाही. आज होणाऱ्या दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये जिंकणाऱ्या संघासोबत दिल्लीचा सामना होणार असून या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाचा सामना आयपीएल 2020 च्या फायनलमध्ये मुंबईसोबत होणार आहे.