टीम इंडिया थँक्यू! ‘हा’ फोटो शेअर करत नॅथन लायनने मानले आभार

0
295

मागील आठवड्यात भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन मायदेशी परतला. हा ऑस्ट्रेलिया दौरा अनेक अर्थांनी भारतीय संघासाठी अविस्मरणीय ठरला. त्यातही ब्रिस्बेन येथे कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवत १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या नॅथन लायनला जर्सी भेट दिली होती. आता याबद्दल नॅथन लायनने आभार मानले आहेत.

नॅथन लायनने आता या जर्सीचा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या जर्सीवर अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मासह एकूण16 खेळाडूंची स्वाक्षरी आहे. फोटो शेअर करताना लायनने भारतीय संघासोबतच अजिंक्य रहाणेचं विशेष कौतुक केलंय. मालिका विजयाबद्दल अजिंक्य रहाणे आणि टीम इंडियाचं त्याने अभिनंदन केलं आहे. अजिंक्य रहाणेच्या खिलाडूवृत्तीचं नॅथन लायनने विशेष कौतुक केलं असून रहाणेला टॅग करुन त्याचे आभारही मानलेत. तसेच टीम इंडियाने सर्व खेळाडूंची स्वाक्षरी असलेली जर्सी दिल्याबद्दलही लायनने आभार मानले आहेत.

अजिंक्य रहाणेला टॅग करुन लायनने, “मालिका जिंकल्याबद्दल अजिंक्य रहाणे आणि टीम इंडियाचं अभिनंदन. तू खिलाडूवृत्ती दाखवत टीम इंडियाच्या खेळाडूंची स्वाक्षरी असलेली जर्सी दिलीस त्यासाठी आभारी आहे” अशा आशयाची पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये लायनने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसोबतचा फोटोही पोस्ट केला आहे. “घरी पोहोचल्याच्या एका आठवड्यानंतर मला मागे वळून बघण्याचा वेळ मिळाला. ऑस्ट्रेलियासाठी खेळणं आणि हिरवी टोपी घालणं माझं नेहमी स्वप्न होतं. ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या काही महान खेळाडूंसोबत खेळण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची मला संधी मिळाली. तसेच अनेकांशी चांगली मैत्रीही झाली, ती जीवनभर टिकेल. जरी आम्ही जिंकलो नसलो तरी १०० वी कसोटी खेळताना ब्रिस्बेनच्या मैदानावर वावरणं वैयक्तिक माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण होता.अशा आशयाची पोस्ट लायनने केली आहे.