Tokyo 2020 Hockey: भारतीय हॉकी संघानं इतिहास रचला, कांस्यपदकावर कोरलं नाव

0
277

भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवलं आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय संघाला हॉकीमध्ये पदक मिळालं आहे. अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केलं. भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे.

उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभव मागे टाकून ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केला आहे. भारताने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढय़ जर्मनीला पराभूत केलं. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. परंतु बेल्जियमविरुद्धच्या चुका टाळून रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर साकारले.

भारतासाठी सिमरनजीत सिंहने दोन, हरमनप्रीत सिंह, रुपिंदर पाल सिंह आणि हार्दिक सिंहनं प्रत्येक एक-एक गोल डागत सामन्यात जर्मनीवर मात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. भारताची सुरुवात काहीशी निराशाजनक होती. जर्मनीनं सामन्याच्या पहिल्या मिनिटालाच गोल डागल 1-0 नं आघाडी घेतली होती. जर्मनीच्या वतीनं तिमुर ओरुजनं गोल केला होता. भारताला पाचव्या मिनिटाला वापसी करण्याची संधी मिळाली. पण पेनल्टी कॉर्नवर गोल करण्यात रुपिंदर पाल सिंह अयशस्वी ठरला.

भारताचा गोलकिपर श्रीजेशनं उत्तम खेळी करत जर्मनीचे अनेक गोल परतवून लावले. श्रीजेशच्या अभेद्य भिंतीमुळेच भारताचा विजय सोपा झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

भारतीय खेळाडूंची खिलाडूवृत्ती
हे ऐतिहासिक पदक मिळविल्यानंतर भारतीय खेळाडू जल्लोष करत होते. दुसरीकडे, चार वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना अश्रू आवरत नव्हते. त्यावेळी भारताचा युवा स्ट्रायकर हार्दिक सिंग याने जर्मनीचा अनुभवी हॉकीपटू निको वेलन याचे सांत्वन करत पाठ थोपटली. त्याचे हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहते हार्दिकचे कौतुक करत आहेत