WTC Final 2021: न्यूझीलंड ठरली कसोटीची बादशहा टीम; भारतावर मात करत पटकावली पहिलीवहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

0
261

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियमवर झाला. या सामन्यात न्यूझीलंडने ८ विकेट्सने विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले. त्यामुळे पहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता होण्याचा मान न्यूझीलंडला मिळाला आहे. या विजयासह त्यांनी अजिंक्यपदाची गदा आणि साधारण १२ कोटी रुपयांचे रोख बक्षीस आपल्या नावे केले. अंतिम सामना जिंकण्यासाठी भारताने चौथ्या डावात न्यूझीलंडपुढे १३९ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान त्यांनी ४५.५ षटकांत ८ विकेट राखून पूर्ण केले. पहिल्या डावात कर्णधार विल्यमसनचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले होते. दुसऱ्या डावात मात्र त्याने ८९ चेंडूत नाबाद ५२ धावांची खेळी केली. त्याला अनुभवी फलंदाज रॉस टेलरने नाबाद ४७ धावांची खेळी करत उत्तम साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या ९६ धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे न्यूझीलंडने हा सामना चौथ्या डावात सहजपणे जिंकला.

साऊथहॅम्पटन येथे झालेल्या या अंतिम सामन्यात पावसाने पहिले चार दिवस जोरदार बॅटिंग केली होती. पहिल्या आणि चौथ्या दिवशी एकही चेंडू न टाकता खेळ रद्द करावा लागला होता. त्यामुळे हा सामना राखीव म्हणजे सहाव्या दिवशीही खेळवण्यात आला. या सामन्यात भारताचा पहिला डाव २१७ धावांत आटोपला होता, ज्याचे उत्तर देताना न्यूझीलंडने २४९ धावा करत पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी मिळवली होती.

भारताचा दुसरा डाव १७० धावांत आटोपला
दुसऱ्या डावात भारताला केवळ १७० धावा करता आल्या. भारताकडून रिषभ पंत (४१) आणि सलामीवीर रोहित शर्मा (३०) यांनी चांगली फलंदाजी केली. परंतु, त्यांना इतरांची साथ लाभली नाही. न्यूझीलंडकडून टीम साऊथीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. भारताचा दुसरा डाव १७० धावांत आटोपल्याने न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी १३९ धावांचे आव्हान मिळाले, जे त्यांनी ८ विकेट राखून पूर्ण केले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या न्यूझीलंड संघाला बक्षीस रक्कम म्हणून 1.6 लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात ही रक्कम 11.72 कोटी मिळणार आहेत. शिवाय न्यूझीलंड संघाने चॅम्पियनशिपची गदाही पटकावली आहे. तर उपविजेत्या भारतीय संघाला 5.85 कोटी रुपये मिळणार आहेत.

यापूर्वी न्यूझीलंडने शेवटचे आयसीसी विजेतेपद २००० साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळवले होते. त्यावेळीही अंतिम सामन्यात भारतालाच पराभूत केले होते.

संक्षिप्त धावफलक

  • नाणेफेक – न्यूझीलंड (गोलंदाजी)
  • भारत पहिला डाव – सर्वबाद २१७ (विराट कोहली ४४, अजिंक्य रहाणे ४९,  काईल जेमीसन ५/३१)
  • न्यूझीलंड पहिला डाव – सर्वबाद २४९ (डेव्हॉन कॉन्वे ५४, केन विल्यमसन ४९, मोहम्मद शमी ४/७६)
  • भारत दुसरा डाव – सर्वबाद १७० (ऋषभ पंत ४१, टिम साऊदी ४/४८)
  • न्यूझीलंड दुसरा डाव – २ बाद १४०* (केन विल्यमसन ५२*, रॉस टेलर ४७* अश्विन २/१७) (न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी)