आजचा दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आहे खास; सचिनचे पहिले कसोटी शतक

0
505

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव म्हणतात. ७ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या सचिन तेंडुलकरच्या नावावर अजूनही क्रिकेटविश्वात अनेक विक्रम आहेत. सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम असो, अजूनही सचिनच्या नावावर आहेत.

भारताच्या सचिन तेंडुलकरला गॉड ऑफ क्रिकेट असे म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर शतकांचे शतक आहे. या ऐतिहासिक प्रवासाची सुरूवात १४ ऑगस्ट रोजी झाली होती. सचिनने इंग्लंडविरुद्ध मॅनचेस्टर येथे पहिले शतक केले होते. ३० वर्षापूर्वी सचिनने मॅनचेस्टरमध्ये झळकावलेले पहिले शतक हे त्याच्या १०० शतकाच्या प्रवासातील पहिले आणि महत्त्वाचे होते. सचिनच्या १०० शतकातील पहिले शतक १४ ऑगस्ट १९९० रोजी झळकावले गेले. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी त्यानेन नाबाद ११९ धावा केल्या आणि टीम इंडियाला पराभवापासून वाचवले. सचिनच्या या पहिल्या शतकाला आज ३० वर्ष पूर्ण झाली.

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ग्रॅहॅम गूच आणि त्याचा सलामीचा साथीदार माईक यांनी शतकं ठोकली होती. कपिल देवच्या नेतृत्वाखालील संघाने जोरदार प्रत्युत्तर दिलं. पहिल्या डावात ४३२ धावांचा डोंगर उभा करत ८७ धावांची आघाडी मिळवली होती. यामध्ये सचिनने ६८ धावांचे योगदान दिलं होतं. इंग्लंडने आपला दुसरा डाव ३२०/४ वर घोषित करत भारताला ४०८ धावांचं लक्ष्य दिलं होतं.

धावांचा पाठलाग करताना भारताचे आघाडीची फळी ११० धावांच्या आत तंबुत परतली. भारत १२७/५ होता आणि जवळजवळ दोन सत्र शिल्लक होती. यामुळे भारत जास्त प्रतिकार करेल असं वाटत नव्हतं. सचिन तेंडुलकरने ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करत भारताला पराभवापासून वाचवलं. सचिनने १८९ चेंडूंचा सामना करत १७ चौकार ठोकत ११९ धावांची खेळी केली होती. सहाव्या क्रमांकावर उतरलेल्या सचिनने मनोज प्रभाकरबरोबर १६० धावांची अखंड भागीदारी करत भारताची धावसंख्या ३४३/६ वर नेली आणि भारतीय संघाला पराभवापासून वाचवलं. सचिनने १४ ऑगस्टला शतक झळकावले आणि दुसर्‍या दिवशी स्वातंत्र्य दिन होता, त्यामुळे ते शतक आणखी खास बनलं.

हा सामना अनिर्णित राहिला असला तरीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटने १७ वर्षाचा एक मुलगा पुढे काय करु शकतो याची झलक पाहिली होती. पुढे जाऊन सचिनने आपल्या वन-डे कारकिर्दीत ४९ तर कसोटी कारकिर्दीत ५१ अशी मिळून १०० शतकं झळकावली.