क्रिकेट घडामोडी: न्यूझीलंडविरुद्ध श्रेयस अय्यरचं पदार्पणात कसोटी शतक; तर आगामी ऍशेससाठी ऑस्ट्रेलियाला मिळाला ‘नवा’ कप्तान;

0
278
श्रेयस अय्यरचं पदार्पणात कसोटी शतक

मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या कसोटीत शानदार शतक झळकावले आहे. अय्यरने कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध १३ चौकार आणि २ षटकारांसह १०५ धावांची खेळी केली. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा अय्यर हा १६वा भारतीय फलंदाज आहे. इतकेच नव्हे, तर कसोटी पदार्पणात शतक ठोकणारा तो सलग तिसरा मुंबईकर ठरला. यापूर्वी रोहित शर्मा आणि पृथ्वी शॉ यांनी ही कामगिरी केली आहे.

भारताचा नवा टी-२० कप्तान रोहित शर्माने २०१३मध्ये कोलकात्यात वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणात कसोटी शतक ठोकले. यावेळी त्याने १७७ धावांची खेळी केली. त्यानंतर सलामीवीर पृथ्वी शॉने वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोटमध्ये १३४ धावांची खेळी केली. आता श्रेयसने आपला क्रमांक फलकावर लावला आहे.

यापूर्वी श्रेयस अय्यर भारताकडून कसोटीमध्ये पदार्पण करणारा ३०३ नंबरचा खेळाडू ठरला आहे. अय्यर गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या कालावधीत क्रिकेट खेळले नव्हते. गेल्या वर्षी खांद्याच्या शस्त्रक्रियेमुळे तो अनेक महिने संघाबाहेर होता. तो २०१९ मध्ये इराणी ट्रॉफीमध्ये शेवटचा खेळला होता.

न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा श्रेयस अय्यर हा तिसरा भारतीय ठरला आहे. याशिवाय कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. गुंडप्पा विश्वनाथ यांनी त्यांच्या आधी १९६९ साली हा पराक्रम केला होता.

ऑस्ट्रेलियाचा नवा कसोटी कर्णधार घोषित

जगातील अव्वल कसोटी गोलंदाज पॅट कमिन्सची ऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा ४७वा कसोटी कर्णधार ठरला आहे. अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. ६५ वर्षात पहिल्यांदाच एखादा गोलंदाज ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे नेतृत्व करेल. कमिन्सने टिम पेनची जागा घेतली आहे.यापूर्वी १९५६ मध्ये रे लिंडवॉल यांनी भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले होते.

दरम्यान पॅट कमिन्स सध्या जागतिक पातळीवर नंबर एकचा कसोटी गोलंदाज आहे. तो संपूर्ण मालिकेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी इतिहासावर नजर टाकली तर प्रसिद्ध फिरकीपटू रिची बेनॉडनंतर २८ वर्षीय कमिन्स हा पहिला पूर्णवेळ कसोटी कर्णधार असणार आहे. बेनॉडच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियान संघाने एकूण २८ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी संघाला १२ सामने जिंकण्यात यश आले. त्यामधील 11 सामने अनिर्णित तर 1सामना बरोबरीचा राहिला आहे आणि 4 सामन्यात संघाचा पराभव झाला होता.