भारत विरुद्ध पाक सामना : प्रतीक्षा संपली ; आशिया क्रिकेट चषकाचे वेळापत्रक जाहीर

0
159

येत्या २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे. या संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रक समोर येताच भारतीय क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. या वेळापत्रकानुसार २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडतील. हा सामना दुबई येथे होणार आहे.

आशिया कपमध्ये टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत गट सामने आणि त्यानंतर सुपर-4 च्या संघांचे सामने 3 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर या कालावधीत होतील. तर आशिया कप 2022 चा अंतिम सामना रविवारी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे.

आशिया कपमध्ये पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात दुबईत होणार आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ रविवारी (28 ऑगस्ट) आमने सामने येणार असून हा सामनाही दुबईत रंगणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. या स्पर्धेची आता सर्वांना उत्सुकता लागलीय.

पाच देश एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार

यंदा आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे पाच देश एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने युएईमध्ये होणार असून दुबई, शारजाह या मैदानात सामने रंगतील. 11 सप्टेंबर रोजी अंतिम सामना पार पडणार आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) तयारीच्या दृष्टीने यंदाचा आशिया कप टीम इंडियासह इतर देशांसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.

आशिया चषकाचे आयोजन श्रीलंकेत केले जाणार होते. मात्र, तेथील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थिती बघता आशिया चषक श्रीलंकेतून यूएईमध्ये हलवण्यात आला. हा निर्णय घेताना आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह म्हणाले होते, “श्रीलंकेतील प्रचलित परिस्थिती लक्षात घेता, एसीसीने व्यापक विचारानंतर एकमताने ठिकाण बदलण्याचा निष्कर्ष काढला आहे. स्पर्धा जरी श्रीलंकेत होणार नसली तरी, लंकेकडे यजमान पदाचे सर्व अधिकार असतील.”