CWC 2022 :वेटलिफ्टींमध्ये सांगलीच्या संकेत सरगरला रौप्यपदक; भारताला पहिलं पदक

0
123

भारताला कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWC 2022) पहिलवहिलं मेडल मिळालं आहे. महाराष्ट्राच्या मुलाने भारताला हे पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं आहे. यासह भारताचं खातं उघडलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीच्या संकेत सरगरनं (Sanket Sargar) भारतासाठी सिल्वर मेडलची कमाई केली आहे. क्लीन अँड जर्कच्या दुसऱ्या प्रयत्नात दुखापत होऊनही त्याने तिसरा प्रयत्नात भारताला सिल्वर मेडल मिळवून दिलं आहे.

भारताचा वेटलिफ्टर संकेत सरगरने पहिल्याच प्रयत्नात १०७ किलो वजन उचलले. दुसऱ्या प्रयत्नातही संकेतने आपले कौशल्य दाखवले आणि यावेळी तो १११ किलो वजन उचलण्यात यशस्वी ठरला. त्याचा तिसरा प्रयत्नही यशस्वी झाला आणि संकेतने ११३ किलो वजन यशस्वीपणे पेलले. स्नॅझमध्ये तो पहिला, मलेशियाच्या बिन कसदन मोहम्मद आणिक १०७ किलोसह दुसऱ्या क्रमांकावर आणि श्रीलंकेचा इसरू कुमार १०५ किलोसह तिसऱ्या क्रमांकावर होता.

संकेत सरगर हा मूळचा सांगलीचा असून त्याचे वडील पान टपरी चालवतात. त्यामुळे हलाखीच्या परिस्थितीतून प्रयत्नांच्या जोरावर संकेतने एक मोठं यश मिळवलं आहे. त्याने कठीण मेहनत आणि अथक परिश्रमांच्या जोरावर ही कामगिरी केली आहे.

सर्वच स्तरातून कौतुक
संकेतने केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्याचं कौतुक केलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक दिग्ग्ज नेत्यांनी संकेतचं कौतुक केलंय. “संकेतने रौप्यपदक जिंकणं ही भारतासाठी चांगली सुरुवात आहे. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा” अशा शब्दात मोदींनी ट्विद्वारे संकेतचं कौतुक केलंय.