भारतीय पुरुष क्रिकेटपटूंनी नुकतीच इंग्लंडला कसोटी मालिकेमध्ये ३-१ अशी धूळ चारत भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंदित केलेलं असताना भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं भारतीयांचा हा आनंद द्विगुणित केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. एवढंच नाही, तर हा टप्पा पार करणारी मिताली ही जगभरात केवळ दुसरी क्रिकेटपटू ठरली आहे.
आफ्रिकेविरुद्ध लखनऊ येथे झालेल्या सामन्यात मितालीने ३५ धावा करताच १० हजार धावांचा टप्पा पार केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम १० हजार धावाचा विक्रम इंग्लंडच्या चार्लेट एडवर्ड्सने केला होता.चार्लेटला मागे टाकण्यासाठी आता मितालीला २९९ धावांची गरज आहे.
1999 मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्याद्वारे मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 10 हजार धावा पूर्ण करण्यासह मिताली क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधार राहिलेली महिला क्रिकेटपटू आहे. तसेच 200हून अधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम देखील तिच्या नावावर आहे. सलग 111 एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्याचा देखील विक्रम तिच्याच नावावर आहे. मितालीने वनडेत सर्वाधिक ६ जार ९७४ धावा केल्या आहेत. वनडेत ७ हजार धावा करण्यासाठी तिला फक्त ३६ धावांची गरज आहे. तिने ८९ टी-२० सामन्यात २ हजार ३६४ धावा तर १० कसोटीत ६३३ धावा केल्या आहेत. मितालीनं आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंत 310 सामने खेळले आहेत. 310 सामन्यात तिनं 10 हजार धावा पूर्ण केल्यात. जवळपास २२ वर्षांहून अधिक काळ मिताली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला एकदिवसीय मालिका सुरू असून त्यात मितालीनं हा विक्रम आपल्या नावे केला आहे. तिनं हा मैलाचा दगड पार करताच BCCI नं ट्वीट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
https://twitter.com/BCCIWomen/status/1370246605224300546?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1370246605224300546%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fkrida-news%2Fskipper-mitali-raj-becomes-first-indian-women-cricketer-to-complete-10000-runs-in-international-cricket-pmw-88-2419392%2F