धोनीपाठोपाठ सुरेश रैनाचीही आंतराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय

0
285

भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने आज संध्याकाळी निवृत्तीची घोषणा करून आपल्या चाहत्यांना धक्का दिल्यानंतर आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवत भारताचा डावखुरा बॅट्समन सुरेश रैना याने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे.धोनीला शुभेच्छा देताना सुरेश रैनानेही त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. ‘तुझ्याबरोबर खेळताना खूप आनंद मिळाला. मला तुझ्याबद्दल खूप अभिमान आहे. याप्रवासात मीही तुझी साथ द्यायला आलो आहे. धन्यवाद भारत, जय हिंद’, अशी इन्स्टाग्राम पोस्ट रैनाने शेयर केली आहे.

https://www.instagram.com/p/CD6d3QChY-V/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading&_ga=2.135596657.174204851.1597398318-1904477052.1585323775

सुरेश रैना आणि महेंद्र सिंह धोनी यांची मैत्री जगजाहीर आहे. दोघेही अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स टिमकडून खेळत आहेत. दोघांनीही अनेकवेळा ऐकमेकांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मधल्या फळीतला भरवशाचा फलंदाज आणि संघाच्या गरजेनुसार ऑफस्पिन बॉलिंग करून यश मिळवणारा रैना एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. कर्णधार असताना धोनीने रैनाच्या या गुणांना हेरून त्याचा चांगला उपयोग करून घेतला होता. आता धोनीने निवृत्ती जाहीर केल्याच्याच दिवशी रैनानेही तीच वाट धरली आहे.

३० जुलै २००५ साली रैनाने श्रीलंकेविरुद्धच्या वनडेमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तर १७ जुलै २०१८ला रैना शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला होता. २०११ साली भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कपच्या टीममध्ये रैना होता. भारताच्या सर्वोत्तम फिल्डर पैकी एक म्हणूनही रैनाने ओळख मिळवली होती.

सुरेश रैनाने २२६ वनडेमध्ये ३५.३१ च्या सरासरीने ५,६१५ रन केले. यामध्ये ५ शतकं आणि ३६ अर्धशतकांचा समावेश होता. तर ७८ टी-२० मॅचमध्ये रैनाने २९.१६ च्या सरासरीने १,६०४ रन केले. रैनाने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १ शतक आणि ५ अर्धशतकं झळकावली. टेस्ट क्रिकेटमध्ये मात्र रैनाला फारसं यश मिळालं नाही. १८ टेस्टमध्ये त्याने २६.४८ च्या सरासरीने ७६८ रन केले, ज्यात १ शतक आणि ७ अर्धशतकांचा समावेश होता. आपल्या पदार्पणाच्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्येच रैनाने शतक केलं होतं.

रैना आयपीएलमधील स्टार खेळाडू आहे. रैनाने अनेक वेळा एकहाती चेन्नईला सामना जिंकून दिला आहे. या स्पर्धेत त्याने १९३ सामन्यात ५ हजार ३५६ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३३.३४ असून स्ट्राईक रेट १३७.१४ इतका आहे. आयपीएलमध्ये रैनाने एक शतक आणि ३८ अर्धशतक झळकावली आहेत.

भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणाऱ्या या दोन्ही खेळाडूंना यापुढे ब्लू जर्सीमध्ये पाहता येणार नाही. पण हे दोघे आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघात एकत्र दिसतील.

गेल्या वर्षी रैनाच्या गुढघ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी रैना प्रयत्न करत होता. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर टी-२० वर्ल्डकपमधील भारतीय संघाची निवड होणार होती. त्यामुळे धोनी प्रमाणे रैनाचा देखील चांगली कामगिरी करून भारतीय संघात प्रवेश करण्याचा प्रयत्न होता. गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर इरफान पठाणशी बोलताना रैनाने निवड समितीने चांगली कामगिरी करून देखील दखल घेतली नाही अशी खंत बोलन दाखवली होती.

सुरेश रैना का आहे स्पेशल:-

  • २००५-०६ मध्ये सुरेश रैनाने भारतीय क्रिकेट संघातून पदार्पण केले. त्यानंतर तो बरीच वर्ष खेळला. सुरेश रैना सुरवातीला मधल्या फळीत फलंदाजी करायचा. पण हळूहळू संघात त्याने स्वत: चे स्थान निश्चित केल्यानंतर त्याने परिस्तिथिनुसार कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी केली. संघाच्या गरजेनुसार रैनाने तिसर्‍या क्रमांकापासून सातव्या क्रमांपर्यंत फलंदाजी केली. यात तो संघाला मदत करण्यासाठी प्रत्येक वेळी पुढे होता आणि कधीही कोणत्याही क्रमांकावर खेळण्यापासून मागे हटला नाही.
  • सुरेश रैना आपल्या कारकीर्दीत भारतीय संघातील अनेक खेळाडूंसोबत खेळला आहे. रैनाने स्वत: भारताकडून खेळताना चमकदार कामगिरी बजावली, परंतु तो आपल्या सहकारी खेळाडूच्या कामगिरीचे अभिनंदन करण्यास नेहमीच तयार असतो.सुरेश रैनाने बर्‍याच वेळा असे दाखवून दिले आहे की, तो ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असेल, त्या खेळाडूच्या आनंदात आणि त्याचे अभिनंदन करायला तो नेहमी पुढे असतो. सुरेश रैनाने बर्‍याच वेळा हे दाखवून दिले आहे.
  • सुरेश रैना खिलाडूवृत्ती जपणारा खेळाडू आहे. युवा असो व सिनिअर सर्व खेळाडूंसोबत खूप चांगले संबंध आहे. तसेच वादविवादापासूनही रैना खूप लांब राहिला आहे. अष्टपैलू आणि हसरा चेहरा यामुळे रैना नेहमी सर्वांना हवाहवासा वाटतो.