आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली असून, रोहित शर्मा कर्णधार तर के. एल. राहुलकडे उपकर्णधार पद सोपवण्यात आले आहे. याशिवाय, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. मोहम्मद शमी आणि दीपक चहर या वेगवान गोलंदाजांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. जायबंदी अष्टपैलू रवींद्र जडेजाला या स्पर्धेला मुकावे लागणार आहे.
जडेजा या स्पर्धेला मुकणार असल्याने डावखुरा फिरकीपटू आणि फलंदाजीत सक्षम अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच दीपक हुडानेही संघातील स्थान राखले आहे. यष्टिरक्षक ऋषभ पंतला ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये फारसा प्रभाव पाडता आलेला नसला, तरी ऑस्ट्रेलियातील यापूर्वीची त्याची कामगिरी आणि डावखुरेपणा, यामुळे त्याचीही संघात निवड झाली आहे.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाला १६ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध मेलबर्न क्रिकेट मैदानावर होईल.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.
राखीव खेळाडू
मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
टी20 विश्वचषकापूर्वी भारत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका खेळणार असून यावेळी सर्वात आधी भारत टी20 मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात सामने खेळण्यासाठी येणार आहे. 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान रंगणाऱ्या या सामन्यांसाठी भारताने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, दीपक चाहर.