कोरोनामुळे गेले दोन वर्ष जणू काही सारं विश्वच थांबलं होतं… मात्र आता निर्बंधमुक्तीनंतर सर्व काही सुरळीत सुरु आहे. अशातच उद्यापासून साताऱ्यामधे महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दोन वर्षांनंतर ही स्पर्धा होत असल्याने यावर्षी सर्व पैलवान मोठ्या तयारीनिशी फडात उतरणार आहेत. १९६३ नंतर तब्बल ५९ वर्षांनी पुन्हा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान सातारा जिल्ह्याला मिळाला आहे ३६ जिल्ह्यातील ४५ संघ सहभागी होणार असून यात एकूण ९०० मल्लांचा समावेश असणार आहे. ५० हजार प्रेक्षक बसतील एवढी बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे छत्रपती शाहु स्टेडीयम या ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत. या मैदानात एकुण ५ आखाडे तयार करण्यात आलेत यात मातीचे २ आणि मॅटचे तीन आखाडे असणार आहेत. महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवण्यासाठी ६ ते ८ मल्लांना चितपट करुनच हा किताब मिळवता येणार आहे.५ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान या स्पर्धा रंगणार आहेत.
कोरोना निर्बंध शिथील झाल्यानंतर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेतला असून ५ ते ९ एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीचं आयोजन झाल्यामुळे राज्यभरातल्या मल्लांमध्ये आणि कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
1961 पासून स्पर्धेला सुरुवात
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची सुरूवात 1961 साली झाली. राज्याच्या विविध भागातल्या अनेक पैलवानांनी महाराष्ट्र केसरी होऊन मानाची चांदीची गदा उंचावली आहे. भारतात कुस्तीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. काही भागात तर घराघरात किमान एकतरी पैलवान पहायला मिळतो. कोल्हापूरला तर कुस्तीची पंढरी म्हटलं जातं. या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून मल्ल कुस्तीची तयारी करण्यासाठी येतात. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे कुस्तीचे आखाडे थंड पडले होते. मात्र कुस्तीचा हा थरार पुन्हा रंगणार असल्याने पैलवानांनी पुन्हा जोमाने तयारी सुरू केली आहे.