Tokyo Olympics : मेरी कोम, मनप्रीत सिंगची भारताचे ध्वजवाहक म्हणून निवड

0
270

कोरोनाच्या संकटामुळे 2020 मध्ये पार पडणारी टोक्यो ऑलम्पिक 2021 (Tokyo Olympics 2021) स्थगित करण्यात आली होती. आता मात्र जपान सरकार, आयोजक समिती आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती यांनी शर्थीच्या प्रयत्नांनी ऑलम्पिक यंदा घेण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने सर्व तयारी देखील झाली असून भारतानेही आपल्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंना ऑलम्पिकसाठी पाठवण्याची संपूर्ण तयारी केली आहे. महान बॉक्सर एम. सी. मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग हे टोक्यो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवाहक असतील. ८ ऑगस्ट रोजी रंगणाऱ्या समारोप सोहळ्यासाठी बजरंग पुनिया याच्याकडे ध्वजवाहकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) टोक्यो स्पर्धा संयोजन समितीशी चर्चा करून ध्वजवाहकांची निवड केली आहे. लैंगिक समानतेला महत्त्व देत भारताने पुरुष आणि महिलांमधून प्रत्येकी एक असे दोन ध्वजवाहक निवडण्याचे ठरवले होते.

पहिल्यांदाच एक नाही दोन ध्वजवाहक
ऑलम्पिकच्या इतिहासात यंदा पहिल्यादांच भारताचे एक नाही तर दोन ध्वजवाहक असतील. नरिंदर बत्रा यांनी खेळांमध्ये लैंगिक समानता दर्शवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती दिली. 2016 च्या रिओ ऑलम्पिकमध्ये भारताचा ध्वजवाहक म्हणून एकमात्र व्यक्तिगत ऑलम्पिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्रा (Abhinav Bindra) याला मान देण्यात आला होता.

भारतासाठी ऑलम्पिक पदक मिळवणारी पहिली महिला

दिग्गज बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम ही भारतासाठी ऑलम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली महिला आहे. 2012 साली मेरीने ऑलम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते. 38 वर्षीय मेरीने आतापर्यंत भारताना अनेक पदकं मिळवून दिली असून तिचे वय पाहता ही तिची शेवटची ऑलम्पिक स्पर्धा असू शकते. त्यामुळे ती यंदा पदक मिळवण्यासाठी जीवाचं रान करणार हे नक्की.

या घोषणेनंतर मेरी कोमनं म्हटलं आहे की, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण खेळाडू म्हणून ही माझी शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा आहे. माझ्यासाठी हे खूप भावनात्मक क्षण असणार आहे. तिनं म्हटलं की, उद्घाटन समारोहामध्ये संघाचं प्रतिनिधित्व करायला मिळणं ही माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. यासाठी माझ्या निवडीबद्दल मी क्रीडा मंत्रालय आणि इंडियन ऑलिम्पिक असोशिएशन यांची आभारी आहे. मी पदक मिळवण्यासाठी सर्वश्रेष्ठ योगदान देईन, असं मेरी कोमनं म्हटलं आहे.

भारतीय पथकात २०१ जणांचा समावेश

भारतीय पथकात १२६ खेळाडू आणि ७५ प्रशिक्षक व अन्य अधिकारी अशा एकूण २०१ जणांचा समावेश असणार आहे. तसेच भारतीय पथकातील १२६ खेळाडूंपैकी ५६ टक्के खेळाडू हे पुरुष असून ४४ टक्के महिला खेळाडू आहेत, अशी माहिती आयओएकडून देण्यात आली. भारताची महान बॉक्सर मेरी कोमचे हे अखेरचे ऑलिम्पिक असेल. तिला याआधी २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकण्यात यश आले होते. यंदा ती सुवर्णपदक जिंकण्यास उत्सुक आहे. तर भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत आपल्या तिसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणार आहे. याआधी त्याने २०१२ लंडन आणि २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.