मराठमोळा तुषार देशपांडेचा बॉलबॉय ते आयपीएल क्रिकेट थक्क करणारा प्रवास

0
265

मराठमोळा तुषार देशपांडे आपल्या पहिल्याच सामन्यात चमकल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली कॅपिटल्सकडून तुषार आज पहिलाच सामना खेळला. पण या सामन्यात तुषारने दिमाखदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. राजस्थानविरुद्ध सामन्यात दिल्लीने मराठमोळ्या तुषार देशपांडेला संधी दिली. तुषारनेही आपल्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत दोन महत्वाचे बळी टिपले. बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन यांची जोडी मैदानावर स्थिरावत असताना शिखर धवनने तुषारला गोलंदाजी सोपवली आणि तुषारने बेन स्टोक्सला जाळ्यात अडकवलं.

२००८ मध्ये आयपीएलचा शुभारंभ झाला. भारतीय क्रिकेटपटूं सोबतच मोठे मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू भारतातील शहरांच्या नावाने असलेल्या संघांसाठी खेळू लागले. तीन तासांच्या खेळात प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होत. भारतातील अनेक तरुण खेळाडू आंतरराष्ट्रीय दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरत. अशातच, अनेक लहान मुले बॉलबॉय म्हणून सीमारेषेवर थांबत असत. आपल्या क्रिकेट संघटनेने निवडलेली ही मुले एखादा चेंडू आपल्याकडे आला तर पुन्हा मैदानात टाकण्यासाठी धावपळ करत. यात, मुंबईत होणाऱ्या सामन्यांत एक तेरा वर्षाचा खेळाडू बॉलबॉयचे काम पाहत. एखाद्या खेळाडूची स्वाक्षरी देखील त्याला मिळत. २००८ मध्ये बॉलबॉय असणारा तो मुलगा २०२० आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसणार आहे. हा बॉलबॉय ते आयपीएलचा खेळाडू असा प्रवास करणारा मुलगा म्हणजे मुंबईकर वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे.

मुळचा कल्याणचा रहिवासी असलेला तुषार देशपांडे स्थानिक क्लबमध्ये नियमीत सरावाला जायचा. सुरुवातीपासूनच चांगला फलंदाज होण्याचं स्वप्न पाहिलेल्या तुषार देशपांडे नंतरच्या काळात गोलंदाज झाला. २००७ साली MCA च्या १३ वर्षाखालील मुलांच्या संघाची निवड शिवाजी पार्क मैदानावर होणार होती. यावेळी ट्रायलसाठी मैदानावर आलेल्या तुषारला फलंदाजीसाठी त्याच्यासारखेच ६०-७० खेळाडू रांगेत दिसले. दुसरीकडे गोलंदाजीच्या रांगेत कमी खेळाडू असल्यामुळे तुषारने गोलंदाजीच्या रांगेत उभं रहायचं ठरवलं. महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी गोलंदाजीसाठी आलेल्या खेळाडूंमध्ये तुषार देशपांडेने आश्वासक मारा करत निवड समितीच्या सदस्यांचं लक्ष वेधलं आणि इथूनच तुषारसाठी मुंबई संघाची दारं खुली झाली.

तुषारने आतापर्यंत मुंबईसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर भारतीय ‘अ’ संघाकडूनही तुषार खेळलेला आहे. त्यामुळे फार कमी वयात तुषारला चांगला अनुभव मिळालेला आहे. तुषार हा एक मध्यमगती गोलंदाज आहे, त्याचबरोबर तो डावखुरा फलंदाजही आहे. त्यामुळे संघाला जेव्हा गरज असेल तेव्हा तो गोलंदाजीबरोबर फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे दिल्लीच्या संघाने तुषारला संघात घेण्याचा निर्णय घेतला होता. पण तुषारनेही यावेळी संधीचे सोने केल्याचेच पाहायला मिळाले.

देशांतर्गत क्रिकेटमधील गेले तीन हंगाम गाजवल्यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये आयपीएलसाठीच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याला ३० लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले. आयपीएलमधील निवडीच्या व दिल्ली संघाविषयी बोलताना तुषार सांगतो, “दिल्ली व्यवस्थापनाने माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहील. रबाडा व इशांत सारख्या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांचा कडून शिकण्यासारखे खूप काही असेल. दिल्लीचे प्रशिक्षक असलेले रिकी पॉंटिंग यांच्याकडून ती ऑस्ट्रेलियन आक्रमक शैली आत्मसात करण्याचा प्रयत्न करेल.”