आशिया कपसाठी व्हीव्हीएस लक्ष्मण राहणार भारताचा प्रशिक्षक; न्यूझीलंड अ संघाविरुद्ध सामन्यांसाठी भारताचा ‘अ संघ जाहीर

0
345

आशिया कप स्पर्धेपूर्वीच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता संघ कोणाच्या प्रशिक्षणाखाली ही भव्य स्पर्धा खेळणार असा प्रश्न उपस्थित होत होता. राहुल लवकरच कोरोनातून सावरुन संघासोबत येईल अशी आशा व्यक्त होत असली तरी बीसीसीआयनं भारतीय संघाचा हंगामी मुख्य प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण याची निवड केली आहे. बीसीसआयनं याबाबत नुकतीच अधिकृत घोषणा केली आहे.

लक्ष्मण याने नुकतीच भारत विरुद्ध झिम्बाब्वे एकदिवसीय मालिकेमध्ये भारताचा कोच म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तीन सामन्यांची एकदिवसीय खेळण्यासाठी काही दिवसांपूर्वी भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर (India tour of Zimbabwe) रवाना झाला होता. या दौऱ्यात नियमित मुख्यप्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) विश्रांती देण्यात आली होती. यामुळं या दौऱ्यात भारताचा लक्ष्मण याला (VVS Laxman) भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाहनं (Jay Shah) याबाबत माहिती दिली होती. यापूर्वी आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतही लक्ष्मण कोच म्हणून संघासोबत होता. या दोन्ही मालिका भारताने जिंकल्या होत्या.

न्यूझीलंड अ संघाविरुद्ध सामन्यांसाठी भारताचा ‘अ संघ जाहीर

भारताचा सिनिअर संघ सध्या आशिया कपच्या तयारीत व्यस्त असताना दुसरीकडे भारतीय ‘अ’ संघाने न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध आपला संघ जाहीर केला आहे. भारतीय अ संघ न्यूझीलंडच्या अ संघाविरुद्ध तीन चारदिवसीय आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. यावेळी चारदिवसीय सामन्यांसाठी भारताने संघ नुकताच जाहीर केला आहे. यावेळी प्रियांक पांचाळ याला कर्णधारपद देण्यात आलं असून ऋतुराज गायकवाड, सरफराज खान, केएस भरत, उमरान मलिक यासारख्या बऱ्याच अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा संघात समावेश आहे.

भारतीय अ संघ पुढीलप्रमाणे

प्रियांक पांचाळ (कर्णधार), अभिमन्यू इश्वरन, ऋतुराज गायकवाड, रजत पाटीदार, सरफराज खान, टिळक वर्मा, केएस भरत (यष्टीरक्षक), उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, सौरभ कुमार, राहुल चहर, प्रसिद्ध कृष्णा, उमरान मलिक, मुकेश कुमार, यश दयाल, अरझान नागवासवा