महिला टी-20 चॅलेंज विजेतेपदाची प्रबळ दावेदार सुपरनोवाजचा सामना फायनलमध्ये ट्रेलब्लेजर्स विरुद्ध होणार आहे. शनिवारी झालेल्या अंतिम साखळी सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात सुपरनोवाज संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील संघ ट्रेलब्लेजर्सचा शनिवारी 2 धावांनी पराभव केला होता.
2018 आणि 2019 ची चॅम्पियन सुपरनोवाजने अंतिम ओव्हरमध्ये ट्रेलब्लेजर्सचा दोन धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. सध्याच्या चॅम्पियन्स संघासाठी सलामीवीर चामरी अटापट्टू (111 धावा) ने शानदार कामगिरी केली. श्रीलंकेच्या या अनुभवी खेळाडूने या मोसमात आतापर्यंत सुपरनोवाजसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत.
सुपरनोवाज संघाची जबाबदारी निश्चितच फॉर्म मध्ये असणाऱ्या चामरी अटापट्टू तसेच कर्णधार अष्टपैलू हरमनप्रीत कौर, जेमीमह रॉड्रिग्स यांच्या फलंदाजीवर तर पूनम यादव, अनुजा पाटील, शकेरा सेलमॅन आणि राधा यादव यांच्या गोलंदाजीवर अवलंबून आहे.
ट्रेलब्लेझर्स संघाची जबाबदारी कर्णधार स्मृती मंधाना, डीन्ड्रा डॉटिन, हर्लीन देओल तर गोलंदाजी अनुभवी झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड आणि सोफी इक्लेस्टोन यांच्यावर अवलंबून असणार आहे.
दोन्ही संघाना आज प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करत ही टूर्नामेंट जिंकण्याची समान संधी आहे. दरम्यान 9 नोव्हेंबरला ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोवाज यांच्यात अंतिम सामना खेळण्यात येणार आहे. हा अंतिम सामना शारजा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. या फायनल मॅचला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
सुपरनोवाज : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमीमह रॉड्रिग्स (उपकर्णधार), चमारी अटापट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शशिकला श्रीवर्धने, पूनम यादव, शकेरा सेलमॅन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, आयुषी सोनी, आयाबोंगा खाका, मुस्कान मलिक
ट्रेलब्लेझर्स : स्मृती मंधाना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), पुनम राऊत, रिचा घोष, डी. हेमलथा, नुझत परविन (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, हर्लीन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दिल बहादूर, सलमा खातून, सोफी इक्लेस्टोन, नाथकं चाणथम, डीन्ड्रा डॉटिन, काश्वी गौतम