सिम स्वॅपिंग म्हणजे काय? नेमकं कसं केलं जातं सिम स्वॅप?

0
730

अलिकडच्या काळात सायबर फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हॅकर्सद्वारे वेगवेगळ्या प्रकारे लोकांना फसवले जात आहे, ज्याची लोक कल्पनाही करत नाहीत. सायबर फसवणूकीसाठी सिम स्वॅपिंग हे एक नवीन तंत्र आहे. हॅकर्स सिम स्वॅपिंगद्वारे लोकांच्या बँक खात्यातून पैसे काढत असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे सिम स्वॅपिंग
या प्रकरणांमध्ये हॅकर्स सिम कार्ड युजर्सकडून त्यांच्या कार्डवर असणारा 20 अंकी नंबर मागून घेतात. त्यानंतर एखादी खास ऑफर सांगून युजर्सना एखाद्या नंबरवर रिप्लाय देण्यास सांगतात. जेव्हा युजर्स या नंबरवर क्लिक करतात तेव्हा त्यांच्या फोनचं नेटवर्क गायब होतं आणि इथून सुरू होतं ‘सिम स्वॅपिंग’.

सिम स्वॅपिंग म्हणजे काय
सिम स्वॅप म्हणजे सिम कार्ड बदलणे किंवा त्याच नंबरचे दुसरे सिम कार्ड मिळविणे. या अंतर्गत, आपल्या मोबाइल नंबरद्वारे आणखी एक सिम नोंदणीकृत आहे. यानंतर, आपले सिम कार्ड बंद केले जाते, हॅकर्सच्या मोबाइलमधील आपल्या नंबरचे सिम कार्ड चालू होते. याचा फायदा घेत तो आपल्या मोबाईलवर ओटीपी नंबर मागतो आणि मग तुमच्या खात्यातून पैसे काढतो.

नेमकं कसं केलं जातं सिम स्वॅप

काही फिशिंग लिंक्स पाठवून त्यावर क्लिक करण्यास सांगितलं जातं आणि तुमची खासगी तसंच आर्थिक माहिती गोळा केली जाते. काहीवेळेस फसवणूक करणाऱ्या एजन्सीज बँकांचा डेटाबेसही विकत घेतात. एकदा तुमची माहिती मिळाली की खोटं ओळखपत्र तयार करून सिम ब्लॉक करण्याची विनंती मोबाइल कंपन्यांना केली जाते. व्हायरस किंवा मालवेअरचा उपयोग करूनही तुमची माहिती गोळा केली जाते._

मोबाइल कंपन्यांनी नवे सिम दिल्यावर त्यावर ओटीपी मिळवून आर्थिक व्यवहार केले जातात. नवे सिमकार्ड त्यांच्याकडे असल्यामुळे ओटीपी त्या फसवणूक करणाऱ्या लोकांकडेच जातो आणि ते पुढील व्यवहार करतात. तुमच्या खात्यातील पैसे अनेक लोकांच्या खात्यांवर वळवले जातात.

. जेव्हा तुम्ही हॅकर्सना तुमचा सिम कार्ड नंबर देता, तेव्हा ते त्या नंबरचे बनावट सिमकार्ड बनवतात.

जेव्हा तुम्ही त्यांनी सांगितलेल्या खास मेसेजवर रिप्लाय करता त्यावेळी कंपनीला असे वाटते की तुम्ही नवीन सिमकार्डसाठी अप्लाय केले आहे. हे सर्व घडण्यासाठी साधारण 2-3 तास लागतात. त्यावेळेत हे हॅकर्स तुम्हाला वारंवार फोन करत राहतात. त्यामुळे अनेक ग्राहक फोन बंद करतात किंवा म्यूट करून ठेवतात. परिणामी त्यांना त्यांच्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडून कोणताही मेसेज मिळत नाही.

सिम स्वॅपिंगपासून बचाव कसा कराल?

प्रत्येक बँक खात्यात इमेल अलर्ट सुविधा दिली पाहिजे. कारण जर अचानक सिम कार्ड बंद झाले, तर कमीत कमी इमेलच्या माध्यमातून तरी आपल्याला समजू शकते की, आपल्या खात्यातून तुमच्या परवानगीशिवाय पैस काढलेआहेत. यामुळे तुम्ही तातडीने बँकेकडे तक्रार करु शकता.

सर्वात महत्वाचे म्हणजे सिम स्वॅपिंगचे काम जास्त करुन शुक्रवार किंवा शनिवारी केले जाते. काही वेळा सुट्टींमध्येही अशी फसवणूक होते. याचे कारण असे की, सुट्टीच्या दिवशी बँक आणि टेलिकॉम कंपनीला संपर्क साधताना आपल्याला अडचणी येतात. यामुळे तुमचे सिम कार्ड जर बंद झाले तर सावधान राहा आणि तातडीने बँकेचं खातं सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करा.