पर्यटकांसाठी गोव्याची दारे आजपासून खुली

0
387

(नियमांचंं पालन करणार्‍यांनाच मिळणार प्रवेश)

भटकंतीसाठी पर्यटकांची पहिली पसंती असणाऱ्या गोवा राज्यात आजपासून पर्यटकांना प्रवेश देण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन व्हावे लागले आहे. त्यामुळे नागरिकांचे सर्व प्रकारचे स्थलांतर थांबले होते. मात्र आता हळूहळू देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. मागील साडे तीन महिन्यांपासून ठप्प असलेला हा पर्यटन व्यवसाय आता हळूहळू पुन्हा पुर्वपदावर आणण्यास सुरूवात होत आहे. गोवा पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेले गोव्यातील जवळपास २५० हॉटेल्स पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आलीय. येत्या २ जुलैपासून गोव्यात प्रवेश करण्यासाठी पर्यटकांना परवानगी दिली जाणार आहे.

दरम्यान, गोवा म्हणजे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. गोवा नेहमी पर्यटकांनी गजबजलेला पाहायला मिळतो. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग ठप्प झालं आहे. गोव्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला होता. कोरोनामुक्त झालेल्या गोव्यात त्यानंतर पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला. अशातच अनलॉकच्या टप्प्यात आता लॉकडाऊनमुळे सुन्न असलेली गोव्यातील पर्यटन स्थळं पुन्हा नियमांचं पालन करत पर्यटकांसाठी खुली होणार आहेत.

गोव्यामध्ये पर्यटनासाठी हे आहेत नियम:-

  • विदेशातील पर्यटकांना परवानगी देण्यात आलेली नाही.
  • गोव्यात येण्यापूर्वी पर्यटकांना त्यांचं हॉटेलमधील राहण्याचं आगाऊ बुकिंग करावं लागणार आहे. हे बुकिंग पुढे पर्यटन विभागाकडे परवानगीसाठी येईल.
  • गोव्यात येताना कोविड निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र सोबत ठेवावं लागणार आहे.
  • कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसल्यास त्याची चाचणी करून घेणं बंधनकारक असेल.
  • कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यास गोव्यात उपचार घ्यावे लागतील किंवा मूळ राज्यात परत जावे लागेल.
  • कोविड संकटात पर्यटनासाठी सरकारमान्य नसलेल्या होम स्टे किंवा किंवा हॉटेल्समध्ये पर्यटकांना थांबण्याची मुभा नसेल.