25 मे पासून देशांतर्गत विमान सेवा होणार सुरु

0
408

(नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली माहिती)

देशांतर्गत विमान वाहतूक येत्या २५ मेपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. सर्व विमानतळांना वाहतुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली. जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर देशांतर्गत विमान वाहतूक सुरू होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देशाच्या सीमा बंद करण्याबरोबच राज्यांच्या सीमाही बंद केल्या होत्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीबरोबर देशातंर्गत विमानसेवा बंद करण्याचा निर्णय केंद्रानं करोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला होता. अखेर लॉकडाउनचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर चौथ्या टप्प्याच्या अखेरीस विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विट करून याविषयीची माहिती दिली आहे.

“२५ मे पासून अंशकालीन पद्धतीनं देशातंर्गत हवाई वाहतूक सुरू करण्यात येईल. २५ मे पासून विमानसेवा सुरू करण्यासाठी सज्ज राहावं, अशी माहिती सर्व विमानतळाच्या प्रशासनाला आणि हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना देण्यात आली आहे. प्रवाशांच्या प्रवासांसंदर्भात नियमावली केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून जारी करण्यात येईल,” असं हरदीप सिंह पुरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पण विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढचे काही महिनेतरी कमीत कमी समान घेऊन जावं लागणार आहे. म्हणजे फक्त एकच बॅग न्यावी लागेल. तसंच विमान तळावर प्रवासाच्या काही तास आधीच पोहोचावं लागेल. तपासणीसाठी प्रवाशांना रांगेत आणि खुणा केलेल्या जागेवर उभं रहावं लागेल. विमानात चढण्यापूर्वी आणि उतरल्यानंतर प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केले जाईल. यामुळे विमान प्रवासापूर्वी प्रवाशांना ही तयारी करावी लागण्याची शक्यता आहे.

विमान कंपन्या आणि विमानतळ प्रशासनामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात चर्चा करण्यात आली. विमान प्रवासासाठी प्रवाशांना वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात येण्याची शक्यता आहे. तसंच प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क आणि ग्लोव्ह्ज दिले जातील, असंही सूत्रांकडून सांगण्यात येतंय. पण नियमावली आल्यावरच याबाबत अधिक स्पष्टता येईल. दरम्यान, विमान प्रवाशांनी उड्डाणाच्या किमान दोन तास आधी विमानतळावर दाखल व्हावं. तसंच सुरक्षेसाठी असलेले गेट उड्डाणाच्या एक तासापूर्वीच बंद केले जावेत, असा प्रस्ताव सीआयएसएफने दिला आहे