नोकरीची सुवर्णसंधी; राज्यात पहिल्यादांच मोठी जम्बो पोलीस भरती

0
411

कोरोना महामारीमुळे बेरोजगारीचे संकट असताना तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. राज्यात पहिल्यांदाच पोलिसांची एवढी मोठी भरती होणार आहे.

अनिल देशमुख यांनी मीडियाशी संवाद साधत ही माहिती दिली. राज्यात पोलीस दलातील साडेबारा हजार पदे भरण्यात येणार आहेत. पोलीस शिपाई संवर्गातील १०० टक्के पदे भरण्यात येणार आहेत, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं. ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. या भरतीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण-तरुणींना पोलीस दलात संधी मिळेल, असं सांगतानाच महाराष्ट्राच्या इतिहासातील पोलीस दलातील ही सर्वात मोठी भरती असल्याचा दावाही त्यांनी केला.

कोरोना महामारीच्या संकटात राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. याचा विविध क्षेत्रांतील परिणाम झाला. आर्थिक अडचणीत आल्यामुळे सरकारनेही विविध भरत्या थांबवण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा पोलिस भरतीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला होता. शिवाय अनेक पोलिसांना करोनाची लागण झाली होती. त्यात काही पोलिसांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे पोलिसांवरील हा ताण कमी करण्यासाठी पोलीस दलात नवी भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.

पोलीस भरतीसह बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनाही संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. तसंच राज्यात कृषी महोत्सव योजना राबवण्याला आणि अंबड येथे जिल्हा आणि तालुका न्यायालय स्थापन आणि पद निर्मितीला मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे.