नवरात्री स्पेशल: भोंडला म्हणजे काय रे? तो कसा साजरा करतात?

0
1793

बालपणीच्या अशा फ़ारच कमी आठवणी असतात ज्या माणसाच्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत-सोबत चालतात. जीवनाला कितीही रंग बदलू देत, आचार-विचारांच्या संरचनेत कितीही बदल झालेत तरीही त्या आठवणी मात्र वास्तवाचे कायम स्मरण करून देत असतात. लहानपणी गावी असताना नवरात्र आली की भोंडलाची वाट पाहायचो. सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांच्या डब्याचा आस्वाद घ्यायचो किती मजा असायची ना त्यामध्ये. पण आताच्या लहान मुलांना त्याबद्दल काही माहिती नाही ये. काय असतो तो भोंडला येथून सर्वांना प्रश्न पडलेला असतो.

भोंडला म्हणजे काय?

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रौत्सवाची सुरुवात होते. पण हस्त नक्षत्रात सूर्याने प्रवेश केला की दुसर्‍या दिवशी हागदा म्हणजेच, भोंडला, सुरू होतो. भोला म्हणजे शिवशंकर आणि म्हणून भुलाबाई म्हणजे उमा-पार्वती. त्यामुळे भोंडल्याला भुलाबाई असेही नाव आहे. नवरात्रीमध्ये आदिशक्तीची, मातृशक्तीची पूजा केली जाते. काही ठिकाणी भोंडळा नऊ दिवस, काही ठिकाणी सोळा दिवस खेळला जातो.

भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो.एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. त्याभोवती फेर धरुन छोट्या मुली, व शाळेतल्या मुली भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.जिच्या घरी भोंडला असतो, तिची आई खिरापत करते. रोज बहुधा वेगळे घर आणि त्यामुळे वेगळी खिरापत असते. म्हणजे पहिल्या दिवशी १, दुसऱ्या दिवशी २ अशा करत करत ९ व्या दिवशी ९ + १ खिरापत असते. फेर धरताना एक छोट्या मुलींचा व १ मोठ्या मुलींचा. असे २ फेरे होतात.सर्वच मुली गाणी म्हणतात. नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्याभोवती मुली फेर धरतात.

देवीच्या पूजनानंतर सर्व मुली गोलाकार उभ्या राहून फेर धरतात आणि एलोपा पैलोमा गणेश देवा
माझा खेह मांडू दे करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी
पाखे घुमती नुरजावरी
अशा गाण्याने भोंडल्याची सुरवात करतात. मग दुसरे गाणे असे करीत अनेक गाणी गायली जातात.

एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू
दोन लिंबू झेलू बाई तीन लिंबू झेलू
असे एखादे गाणे गाऊन ते सर्व आनंद साजरा करतात

मुलीनी एकत्र येऊन फेराची गाणी म्हणणे याच्या मुळाशी मोठा अर्थ आहे. आषाढ-श्रावणातल्या पावसानं भूमीला तृप्त केलेलं असतं. अश्विन महिन्यात ही तृप्त झालेली भूमी भरघोस पिकांच्या रूपाने रसरसून बहरलेली असते. जमिनीची सफलताची नवनिर्माणाची ताकद पूर्णत्वाला पोहोचलेली असते. अशा वेळीच भोंडलाचे फेर धरले जातात; कारण स्त्री ही भूमीप्रमाणे सर्जनशील आहे.

धरणीसारखी तिच्याकडेही निर्माणाची शक्ती आहे. कुमारिका तर सुफल होण्याच्या शक्तीने ओतप्रोत भरलेली असते. म्हणून भूमीशी साधर्म असणा-या कुमारिका भूमीची सुफलनाची शक्ती भरात असणा-या काळात त्या समृद्धीचा उत्सव गाणी म्हणून साजरा करतात.

आधुनिक काळात भोंडला हा केवळ मुलीचा घरगुती कार्यक्रम राहिला नसून त्याला सामाजिक स्वरूप आले आहे. विविध सामाजिक संस्था, महिला संघटना , राजकीय पक्ष हे महिला- मुलींसाठी भोंडला आयोजित करतात.परदेशातील भारतीय लोक तिथे स्थानिक पातळीवर भोंडला आयोजित करून आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करताना दिसतात.