कांद्यानं आणलं डोळ्यात पाणी; राज्यात कांद्याचे भाव कडाडले

0
430

बाजारात मागणी वाढल्यानं कांद्याच्या दराने पुन्हा उसळी मारली आहे. मुंबई आणि पुण्यात कांद्याचा भाव प्रति किलो १०० इतका झाला आहे. पुरवठ्यात कमतरता होत असल्यानं कांद्याचे भाव वाढली आहेत.

पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातील कांद्याला परराज्यातून वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत स्थानिक भागातून पुरवठा कमी होत असल्याने कांद्याचे घाऊक बाजारासह किरकोळ बाजारात दर वाढले आहेत. घाऊक बाजारात कांदा १० किलोंसाठी ७०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर, किरकोळ बाजारात कांदा आता ९० ते १०० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ऐन सणासुदीच्या काळात कांदा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे.

पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतातील कांद्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळेच सध्या बाजारात कांद्याचे दर (Onion Price) सातत्याने वाढत आहेत. नवरात्रीत उत्तर भारतासह देशातील अनेक भागांमध्ये कांदा खाल्ला जात नाही. यामुळे कांद्याची मागणी घटते. मात्र, असं असतानाही यंदा कांद्याच्या किमतीत कोणतीही घट झालेली नाही.

पुणे मार्केट यार्डात २१ ऑक्टोबरला ४० ते ५० ट्रक कांद्याची आवक झाली आहे. आवक सध्या कमी असली तरी कांद्याला मागणी अधिक आहे. अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नवीन कांद्याचा हंगामही लांबला आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मंगळवारी कांद्याचे दर वाढले आहेत. केंद्र सरकारने यापूर्वीच कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. कांदा उपलब्ध होत असला तरी पावसामुळे जुना कांदा काही प्रमाणात खराब झाला आहे. तर, नवीन कांद्याचे पीक वाया गेल्यासारखेच आहे. त्यात नवीन कांदा हातात जो आला आहे त्याची प्रत खराब आहे.