शिव-शंभूप्रेमींचा लढा यशस्वी ; अखेर संभाजी बिडीचं नाव बदलणार

0
279
  • 78 वर्षांपासून विक्री होत असलेल्या ‘या’ बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय

गेल्या कित्येक वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्यात तसेच राज्याबाहेर बिडी विकली जात आहे. या विरोधात राज्यातील शिवभक्तांनी आक्रमक भूमिका घेतली होती. संबंधित बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीने आपल्या उत्पादनाचे नाव बदलावे, यासाठी शिवप्रेमींनी, संभाजी ब्रिगेड आणि काही राजकीय संघटनांनी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला आंदोलन सुरु केले होते. आज अखेर शिवभक्तांच्या या आंदोलनाला यश आले आहे. संभाजी बिडीचं नाव अखेर बदलण्यात येणार आहे. या बिडीचं उत्पादन करणाऱ्या साबळे-वाघिरे ग्रुपने हा निर्णय घेतला आहे. मात्र नाव बदलण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

संभाजी ब्रिगेड, शिवधर्म फाऊंडेशन आणि इतर शिवप्रेमी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जनभावनेचा आदर करुन आम्ही विडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे साबळे वाघेरे आणि कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले. विडी व्यवसाय हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. संभाजी महाराजांच्या आदरापोटीच आमच्या वडिलांनी या उत्पादनला त्यांचे नाव दिले होते. त्यामागे अवमान करण्याचा कुठलाही हेतू नव्हता. २०११ मध्ये संभाजी ब्रिगेडच्या मागणीनुसार आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो व छत्रपती हा शब्द पॅकेटवरून हटवला होता. आताही आमची भूमिका सकारात्मक आहे. आमच्या व्यवसायावर ६० ते ७० हजार कामगारांचा प्रंपच सुरू आहे. यात प्रामुख्यानं महिलांचा समावेश आहे. आम्ही तडकाफडकी नाव बदलले तर आमच्या व्यवसायाची साखळी तुटेल. हा व्यवसाय बंद पडला तर हजारो कुटुंबांवर त्याचा परिणाम होईल. त्यामुळं सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती कंपनीच्या प्रमुखांनी केली आहे. कंपनी आपल्या उत्पादनासाठी नवीन नाव कायदेशीर प्रक्रियेने नोंदवणार आहे. म्हणजेच संभाजी बिडीऐवजी नवं नाव रजिस्टर केलं जाईल. जेणेकरुन हे नवीन नाव ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल, असं कंपनीचं म्हणणं आहे.

यापूर्वी अनेक नेत्यांनी संबंधित बिडी उत्पादनाचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी उचलून धरली होती. छत्रपती संभाजी राजे यांच्या नावाने असलेल्या बिडीला भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. बिडीला संभाजी राजेंचं नाव देण्याचं धाडस महाराष्ट्रात होतं, इथेचं आपण कमी पडलो,’ अशी खंत नीतेश राणे यांनी व्यक्त केली होती. याशिवाय राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांनीदेखील यासंदर्भात आक्रमक भूमिका घेत, कंपनीने तात्काळ उत्पादनाचे नाव बदलावे, असं आवाहन केलं होतं.