सीडीएस जनरल बिपीन रावत यांना घेऊन जाणारे लष्कराचे Mi-17 हेलिकॉप्टर तामिळनाडूत कोसळले. कुन्नूरच्या जंगलात बुधवारी दुपारी 12:20 च्या सुमारास कोसळताच हेलिकॉप्टरला आग लागली. यामध्ये जनरल रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि लष्करी अधिकाऱ्यांसह 14 जण होते. त्या सर्वांचाच मृत्यू झाला आहे. आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं एमआय १७ ५ व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळले. इथल्या डोंगरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तिथे तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अपघातात सीडीएस बिपीन रावत हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
आगाची भडका उडाला अन् झाडांनी पेट घेतला
बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. वेलिंग्टनमध्ये आर्म्ड फोर्सचं महाविद्यालय आहे. या ठिकाणी रावत यांचं लेक्चर होतं. तिथून ते कुन्नूरकडे निघाले होते. त्यांना तिथून दिल्लीला जायचं होतं. मात्र, घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली. कुन्नूरच्या घनदाट जंगलात चारही बाजूने झाडच झाडं आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघात होताच जंगलात आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळतात हवाई दल आणि लष्कराची पथकं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. हे हेलिकॉप्टर एमआय-सीरिजचं असल्याचं सांगितलं जातं. MI-17, V-5 या सीरिजचं हे हेलिकॉप्टर होतं. बिपीन रावत यांच्यासोबत काही अधिकारी आणि कर्मचारीही होतं.
बिपीन रावत यांच्याबद्दल माहिती:
बिपिन रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ रोजी डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील एल. एस रावत देखील लष्करातच होते. लेफ्टनंट जनरल एल. एस. रावत म्हणून ते ओळखले जायचे. वडील लष्कारमध्ये असल्याने बिपिन रावत यांचं बालपण लष्करी शिस्तीमध्येच गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिमल्यामधील सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं. त्यानंतर बिपीन रावत यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि ते पुन्हा आपल्या जन्मस्थळी म्हणजेच डेहराडूनला गेले.
या अकादमीमधील त्यांची चमकदार कामिही पाहून त्यांना स्वार्ड ऑफ ऑनर हे पहिलं सन्मानपत्र मिळालं. त्यानंतर बिपिन रावत यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली.
अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर बिपिन रावत यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. १६ डिसेंबर १९७८ रोजी बिपिन यांचं लष्करात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांना भारतीय लष्कराच्या गोरखा १ रायफल्सच्या पाचव्या बटालियनमध्ये पहिल्यांदा लष्करी जवान म्हणून संधी मिळाली. इथूनच त्यांचा लष्करामधील कारकिर्दीचा प्रवास सुरू झाला. इथे रावत यांना सैन्याचे अनेक नियम शिकण्याची संधी मिळाली. इथं त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर क्रॉप्स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आयएमए देहरादून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवर काम केलं.
अनेक पदकं…
आपल्या लष्करी सेवेदरम्यान बिपिन रावत यांना अनेक पुरस्कारही मिळालेत. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली आहेत. त्यांच्या सेवेत जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे.