ख्रिस गेलनं मानले पंतप्रधान मोदींचे आभार, जाणून घ्या काय आहे कारण

0
248

पूर्ण जगाला भेडसवणाऱ्या कोरोना व्हायरसवर (Coronavirus) वर मात करण्यासाठी भारतानं पुढाकार घेतला आहे. भारताने मैत्री अभियानाच्या अंतर्गत ( अनेक देशांना कोरोना वॅक्सिनचा (Corona Vaccine) पुरवठा केला आहे. भारताने काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिज बेटावरच्या जमैका अ‍ॅण्टिग्वा, बार्बाडोस, सेंट किट्स आणि नेविस, सेंट विंसेन्ट, सुरीनाम यासारख्या देशांना कोरोना वॅक्सिनचा डोस दिला आहे. भारत सरकारच्या या चांगल्या कामाचं जगभरातून कौतुक होत आहे. वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन ख्रिस गेल (Chris Gayle) याने देखील याबद्दल भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

गेलने एका व्हिडिओ संदेशाद्वारे भारताचे आभार मानले. जमैकामधील भारतीय दूतावासाने ख्रिस गेलचा १७ सेकंदांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. “करोना व्हॅक्सिन दान केल्याबद्दल मी भारत सरकार, पंतप्रधान मोदी आणि भारताच्या जनतेचे खूप आभार मानतो…आम्ही याचं कौतुक करतो….लवकरच भारतात येईल…पुन्हा एकदा व्हॅक्सिनसाठी खूप खूप आभारी आहोत”, असं गेलने म्हटलंय.

वेस्ट इंडिजचे माजी कॅप्टन व्हिवियन रिचर्ड्स, रिची रिचर्डसन तसंच जिमी अ‍ॅडम्स यांनी देखील याबाबत भारत सरकार आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानले होते.

व्हिवियन रिचर्ड्स यांनी अ‍ॅण्टिग्वा आणि बार्बोडस देशांच्या नागरिकांच्या वतीने मोदींचे आभार मानले आहेत. ‘भारताने आम्हाला कोरोना वॅक्सीनचा पुरवठा केला, त्यामुळे आमचे संबंध आणखी घट्ट झाले आहेत,’ अशी भावना रिचर्ड्स यांनी व्यक्त केली आहे. तर रिची रिचर्ड्सन यांनी भारताने 40 हजार डोस पाठवल्याबद्दल भारत सरकार आणि मोदींचे आभार व्यक्त केले होते.