रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली. रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केली असून युद्धाला सुरुवात झाली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. पुतिन यांनी रशिया विशेष लष्करी ऑपरेशनला सुरुवात करणार सांगतना या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असेल असंही सांगितलं. यावेळी त्यांनी युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली ठेवा आणि आपल्या घऱी निघून जा असंही सांगितलं. इतकंच नाही तर अमेरिकेसह इतर युरोपला मधे पडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला.
रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये खळबळ
रशियाने युक्रेनची राजधानी कीववरदेखील हल्ला केला. डोन्बास प्रांतावर हल्ला करण्यासह युक्रेनच्या राजधानीवर हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली. रशियाच्या हल्ल्याचा युक्रेनच्या सैन्याने प्रतिकार सुरू केला आहे. दरम्यान, युक्रेनच्या सैन्यानेही रशियन हवाई दलाला झटका दिला आहे. रशियाची पाच विमाने पाडली असल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे. युक्रेनने नागरी विमानांसाठी हवाई वाहतूक बंद केली आहे. रशियाने हल्ला केल्यानंतर कीवमध्ये गोंधळाची स्थिती आहे. शहर सोडून जाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांग रांगासह मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
रशियाने नाझी जर्मनीप्रमाणे हल्ला केलाय”
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाने नाझी जर्मनीप्रमाणे हल्ला केल्याचं म्हटलं असून काही झालं तर आपलं स्वातंत्र्य हिरावू देणार नसल्याचं सांगितलं आहे. “रशियाने विश्वासघातकीपणे सकाळी हल्ला केला, ज्याप्रमाणे नाझी जर्मनीप्रमाणे दुसऱ्या महायुद्धात केला होता. सध्याच्या घडीला आपले देश जागतिक इतिहासाच्या वेगवेगळ्या दिशेला आहेत. रशियाने दृष्ट मार्गाची निवड केली असताना युक्रेन आपलं रक्षण करत असून मॉस्कोला काही वाटत असलं तरी आपलं स्वातंत्र्य देणार नाही,” असं ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी नागरिकांना आपलं घरं आणि शहर वाचवण्यासाठी तयार राहा असं आवाहनही केलं आहे.
पीएम मोदींना मदतीचे आवाहन
युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या तणावात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोल्खा यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींना आवाहन करत त्यांनी याबाबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी तात्काळ बोलायला हवे. युक्रेनच्या राजदूताने सांगितले की, राजधानी कीवजवळही हल्ले झाले आहेत. रशिया युक्रेनवर हल्ला करत आहे. यावेळी मोदीजी खूप मोठे नेते आहेत, आम्ही त्यांना मदतीचे आवाहन करतो. जगातील तणाव केवळ भारतच कमी करू शकतो. त्यांनी सांगितले की, 5 रशियन विमाने पाडण्यात आली आहेत.
भारतीय नागरिकांसाठी युक्रेनमधील दूतावासाकडून नवी मार्गदर्शक सूचना
सध्या भारतीय नागरिकांसाठी युक्रेनमधील दूतावासाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार भारतीय नागरिक युक्रेनच्या पश्चिमेकडे स्थलांतर करु शकतात. मात्र, आपल्यासोबत आपले पासपोर्ट आणि गरजेची कागदपत्र सोबत बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेच. त्यासोबत दूतावासाकडून हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आले आहे. या अगोदर भारतीय नागरिकांना आणण्यासाठी गेलेले विमान माघारी आले.
मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की, युद्धामुळे युक्रेन विमानतळ बंद करण्यात आले आहे. भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार केला जात आहे. अडचणीत असलेले नागरिकांना मदतीसाठी दुतावासाच्या वेबसाईट, सोशल मीडिया आणि दूरध्वनी क्रमांकवर संपर्क साधता येणार आहे. या शिवाय दूतावासाने हेल्पलाईन नंबर देखील जारी केला आहे. मदतीसाठी नागरिकांना +38 0997300428, +38 0997300483, +38 0933980327, +38 0635917881, +38 0935046170 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.