राष्ट्राध्यक्षपदासाठी अमेरिकेत आज मतदान; कशी होते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड?

0
461

जगभराचे लक्ष लागून असलेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडणार आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी पोस्टल मतदान सुरू केले होते. आज प्रत्यक्ष निवडणूक पार पडणार आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी फक्त बहुमत मिळणे पुरेसे नाही. लोकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले तरी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव होऊ शकतो.

यंदाची निवडणूक अतिशय अटीतटीची होणार असल्याचा अंदाज आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसर्‍यांदा निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांचे आव्हान आहे. बिडेन हे बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना उपराष्ट्राध्यक्ष होते. निवडणूक प्रचारात कोरोनाचा संसर्ग, वर्णद्वेष, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण आदी मुद्दे ठळकपणे समोर आले होते.

अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारनंतरच्या मंगळवारी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येते. अमेरिकेत स्थानिक वेळेनुसार सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदारांना या कालावधीत मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करता येणार आहे. अमेरिकेत मतदानानंतर तातडीने निवडणुकीचे कल येण्यास सुरुवात होते. यामध्ये बर्‍यापैकी कल स्पष्ट झालेला असतो. मात्र, यंदाचे चित्र वेगळे असून, नऊ कोटी पोस्टल मते आहेत. त्यामुळे कल समोर येण्यास अधिक वेळ लागू शकतो. मतदान संपल्यानंतर काही राज्यांमध्ये निवडणूक निकाल जाहीर होऊ शकतात.

अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे मतदार एक मोठी भूमिका बजावणार असल्याचं म्हटलं जात आहे. १६ राज्यांमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या अमेरिकेतील नागरिकांपेक्षाही अधिक आहे. परंतु १३ लाख भारतीय त्या आठ राज्यांमध्ये राहतात ज्या ठिकाणी चुरशीची लढत आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही पक्षाला एक मतही बहुमोल ठरणार आहे. अमेरिकेत मतदानासाठी मेल किंवा लवकर मत देणं आणि दुसरं मतदान केंद्रांवर जाऊन मत देणं असे पर्याय उपलब्ध आहेत.

अमेरिकेची निवडणूक कशी होते?

भारतासकट इतर अनेक देशांमध्ये अनेक राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असतात. पण अमेरिकेच्या राजकारणात दोनच पक्षांचा दबदबा आहे. म्हणूनच राष्ट्राध्यक्ष हा नेहमीच या दोनपैकी एका पक्षाचा असतो.

रिपब्लिकन पक्ष हा अमेरिकन राजकारणातला पारंपरिक विचारसरणीचा पक्ष आहे आणि यावर्षी राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे त्यांचे उमेदवार आहेत सध्या राष्ट्राध्यक्ष असणारे डोनाल्ड ट्रंप. आपल्याला आणखी 4 वर्षं सत्तेत राहता येईल, अशी आशा त्यांना आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश, रोनाल्ड रेगन, रिचर्ड निक्सन हे रिपब्लिकन पक्षाचे होते.

अमेरिकेतला पुरोगामी विचारसरणीचा राजकीय पक्ष म्हणजे डेमोक्रॅटिक पक्ष. जॉन एफ. केनेडी, बिल क्लिंटन, बराक ओबामा हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डेमोक्रॅटिक पक्षाचे होते. यावर्षी राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आहेत जो बायडन. अत्यंत अनुभवी असणारे जो बायडन हे बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतानाची 8 वर्षं उप-राष्ट्राध्यक्ष होते.

राष्ट्राध्यक्षांची निवड कशी होते?

अमेरिकेत इलेक्टोरल कॉलेज राष्ट्राध्यक्षांची निवड करतात. अमेरिकेच्या निवडणुकीत ज्या उमेदवाराला बहुमत मिळेल तोच विजयी होईल, याची खात्री नसते. राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार इलेक्टोरल कॉलेज मतदान आपल्या बाजूने जिंकण्याचा प्रयत्न करतात. इलेक्टोरल कॉलेजची संख्या ही प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येनुसार ठरवण्यात आली आहे. इलेक्टोरल कॉलेजची एकूण संख्या ५३८ असते. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवाराला २७० अथवा अधिक मते मिळवावी लागतात. म्हणेच ज्यावेळी नागरीक मतदान करतात त्यावेळी ते आपल्या राज्याचा प्रतिनिधी निवडतात. थेट राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान करत नाहीत. तर, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी राष्ट्राध्यक्षाची निवड करतात.

ही निवडणूक फक्त राष्ट्राध्यक्ष निवडण्यापुरतीच मर्यादित नसते. ट्रंप विरुद्ध बायडन या मुकाबल्याकडे सगळ्यांचं लक्ष असलं तरी याच निवडणुकीद्वारे मतदार काँग्रेसच्या नवीन सदस्यांची निवड करतील. अमेरिकन सरकारमधल्या कायदे लिहिणाऱ्या आणि मंजूर करणाऱ्या गटाला ‘काँग्रेस’ म्हटलं जातं. यामध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज आणि सिनेट अशी दोन सदनं असतात.

यापैकी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज किंवा ‘हाऊस’च्या सदस्यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असतो. तर सिनेटच्या सदस्यांचा म्हणजेच सिनेटर्सचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. सिनेटर्सची विभागणी 3 गटांमध्ये होते आणि दर दोन वर्षांनी सिनेटच्या एक तृतीयांश जागांची निवडणूक होते.